सुधागडची आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर; निधीअभावी ग्रामीण रुग्णालय लटकले, आदिवासी रुग्णांची फरफट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून सुधागडच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लटकल्याने येथील आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर आहे. पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ती अपुरी पडत असल्यामुळे आदिवासी रुग्णांना जादाचे पैसे देऊन खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. निधी अभावी या रुग्णालयातील अंतर्गत काम प्रलंबित आहे. त्यामुळे योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांची फरफट होत आहे.

पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात स्थलांतरित आहे. ही तात्पुरती व्यवस्था आता कायमस्वरूपी चालत असून येथे केवळ ओपीडी सेवा सुरू आहे. प्रसूती, आपत्कालीन उपचार आणि तपासण्या शक्य नसल्याने रुग्णांना इतर शहरांकडे हलवावे लागते, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित तळेकर यांनी सांगितले. याठिकाणी बेडची व्यवस्था नाही. तसेच प्रसूती करणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला रुग्णांना अलिबाग येथे पाठवावे लागते. अत्यंत क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली तरच आम्ही इथे बाळंतपण करतो असेही ते म्हणाले.

ही कामे अपूर्ण

ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी फायर फायटिंग सिस्टीम, डी.जी. सेट, स्ट्रीट लाईट्स व इतर विद्युत कामे अपूर्ण आहेत. या कामांसाठी सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा वाढीव निधी प्रस्तावित आहे. त्याशिवाय कंपाऊंड वॉल, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था आणि कर्मचारी निवासस्थानांसाठी आणखी आठ कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी मंजूर झाल्यास पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी दिनेश पराते यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप इमारत हस्तांतरित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडली आहे. आरोग्य विभागाला आवश्यक यंत्रसामग्री बसवणे व सेवा सुरू करणे शक्य होत नाही.

निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग.

Comments are closed.