लग्न जुळत नाही म्हणून बुलढाण्यात तरुणाने जीवन संपवले, पाच दिवसांत दुसरी घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सध्या उपवर मुलांच्या लग्नाचा विषय अतिशय गंभीर बनला आहे. लग्न जुळत नाही म्हणून तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही लग्न जुळत नसल्यामुळे आता तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. बुलढाणा जिल्हय़ात लग्न जमत नसल्यामुळे पाच दिवसांत दोन तरुणांनी मृत्यूला कवटाळले. पहिली आत्महत्या चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे, तर दुसरी आत्महत्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे झाली.

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावात एका 28 वर्षीय तरुणाने स्वतŠच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. हरीश अरुण वानखडे (28) असे या तरुणाचे नाव असून, लग्न जुळत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आणि घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हरीश वानखडे याच्या लग्नासाठी त्याचे कुटुंब दोन वर्षांपासून प्रयत्न करत होते. मात्र कधी परिस्थिती चांगली नाही, कधी जमीन नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्याला मुलींकडून नकार येत होता. होतकरू असलेल्या हरीशला सातत्याने मुलींकडून येणारे नकार पचवणे अवघड गेले. विमनस्क अवस्थेत त्याने 20 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेतला. या प्रकरणी श्याम वानखेडे यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लग्न जमत नसल्यामुळे या अगोदर 18 एप्रिल रोजी चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे सत्यपाल साहेबराव भिसे या तरुणाने आत्महत्या केली. सत्यपाल हा सुशिक्षित होता. मात्र त्याला नोकरी नव्हती. सर्व मित्रांचे लग्न झाले, परंतु आपले लग्न जुळत नाही, यामुळे त्याला नैराश्य आले होते. त्यातच त्याला दारूचे व्यसनही लागले. याच विमनस्क अवस्थेत सत्यपालने शेतात गळफास घेतला.

Comments are closed.