अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात 30 गावांतील पाणी दूषित
अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च महिन्याचा पाणी शुद्धीकरण, सनियंत्रण व टीसीएल गुणवत्ता तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यात मार्चमध्ये जिल्ह्यातील 5 गावांच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर नमुन्यांत 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळून आले, तर 30 गावांचे 89 पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवून आवश्यक सूचना केल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पाणी नमुन्यांची प्रयोग शाळेतून तपासणी केली जाते. त्याच्या अहवालानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना केल्या जातात. दरम्यान, मागील वर्षी 1 एप्रिल 2025 ते 1 एप्रिल 2026 या वर्षभराच्या कालावधीत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील गावांचे 23 हजार 303 नमुने तपासले असून, यात 624 पाणी नमुने दूषित आढळलेले आहे. हे प्रमाण 2.68 टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरबाबत त्रुटी आढळल्या आहेत. त्या ठिकाणी तत्काळ ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच ज्या ठिकाणचे पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य आढळले आहेत, त्या ठिकाणी तत्काळ शुद्धीकरण करून पुनर्तपासणी करून घेण्यात यावी. त्यानंतर योग्य असला तरच तो पाणीस्रोत पिण्यासाठी वापरावा, अशा सूचना डॉ. नागरगोजे यांनी दिल्या आहेत.
गेल्या वर्षभरात पाणी नमुने दूषित आढळलेली तालुकानिहाय संख्या – अकोले 197, जामखेड 21, कर्जत 19, कोपरगाव 4, नगर 60, नेवासा 41, पारनेर 48, पाथर्डी 31, राहाता 11, राहुरी 41, संगमनेर 81, शेवगाव 26, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 25.
ब्लिचिंग पावडर दूषित असलेली तालुकानिहाय गावे
– नेवासा 1, पारनेर 2, श्रीगोंदा 2 तर नेवासा तालुक्यातील टोका, पारनेरच्या काळस, करंदी, श्रीगोंद्याच्या चोरमलवाडी आणि कौठा या गावातील पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱया पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण हे 20 टक्क्यांपेक्षा कमी आढळून आलेले आहेत.
दूषित पाणी असणारी गावे
अकोले – राजूर, विठे, निरगुडवाडी, चिंचोडी, मूरशेत, पांजरे, सामद्र, मुतखेल.
नेवासा – वाशिम, टोका, मक्तापूर
पाथर्डी – कासारपिंपळगाव, भालगाव, मोहठे.
राहुरी – मानोरी. संगमनेर – निमोण, कुरण. शेवगाव – शेवगाव, कऱहे टाकळी. श्रीगोंदा – मुंढेकरवाडी, डोमाळेवाडी. कर्जत – खातगाव, आळसुंदे, देशमुखवाडी, नागापूर. अहिल्यानगर – आगडगाव.
Comments are closed.