Yavatmal crime news – घरफोडी करणारी अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात; सोनं-चांदीच्या दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ जिल्ह्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. मारेगाव येथे झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 21 लाख 37 हजार 771 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणात चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
मारेगाव येथील रहिवासी सुशील जगेंवार यांनी 7 एप्रिल रोजी त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.
तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दोन अल्पवयीन मुलांनी ही चोरी केली असून त्यांनी चोरीचा माल पुसदमार्गे उमरखेड येथील एका सराफाला विकला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित अल्पवयीनांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या मुलांनी नथ्थू कुरकुटे व दत्ता कुरकुटे (रा. नागवाडी, ता. पुसद) यांच्या मध्यस्थीने चोरीचे दागिने विकल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पुसद गाठून दत्ता सटवाजी कुरकुटे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दत्ता पेंडकर, सपोनि धिरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, शरद लोहकर, मुन्ना आडे, संतोष भोरगे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर आणि सुधीर पिदुरकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Comments are closed.