भाजप महिला आरक्षणाचा ‘सिरियल किलर’, विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
भाजप सरकारचे महिला आरक्षणाचे विधेयक म्हणजे केवळ जुमलेबाजी असून, प्रत्यक्षात भाजपच महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वरळीतील ‘महिला आक्रोश’ आंदोलनाचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले की, 20-30 महिलांना एकत्र करून केलेले आंदोलन म्हणजे जनतेचा आवाज नव्हे. काल एका सामान्य महिलेने ज्या शूरवीराप्रमाणे सरकारला आरसा दाखवला, तोच खरा महिलांचा आक्रोश आहे. यावरून जनतेला भाजपचे ‘जुमलेबाजी’चे राजकारण आता पूर्णपणे समजले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आरक्षण विधेयकावर प्रश्नचिन्ह
2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षणाचे विधेयक आले, तेव्हा काँग्रेससह विरोधकांनी त्याला पूर्ण समर्थन दिले होते. मात्र, त्या विधेयकात ‘नारी शक्ती’चा उल्लेख कुठे होता? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 58 वेळा काँग्रेसचे नाव घेतले, पण महिलांच्या हितावर भाष्य करण्याचे टाळले. राहुल गांधी हे एक सच्चे नेते असून त्यांनी आरक्षणाबाबत नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. मात्र, निवडणुका जवळ आल्या की उत्तर ते दक्षिण कोण सरड्यासारखे रंग बदलतो, हे देशाला चांगलेच ठाऊक आहे.
…तर राज्यात मोठा उद्रेक झाला असता
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, सुनेत्रा ताईंनी ही भूमिका मांडायला उशीर केला आहे. हा नेमका घातपात होता का? असा संशय संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जर हे वक्तव्य आधी आले असते तर राज्यात मोठा उद्रेक झाला असता.
Comments are closed.