अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका! बारामती पोटनिवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहेत, त्याचे निरसन झाले पाहिजे, प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. तपास यंत्रणांकडून सत्य समोर आलेच पाहिजे. यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच मांडली. माझे दुःख मोठे आहे, माझे सर्वस्व हरपले आहे, लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर अजितदादांचे स्वप्न, कर्तव्याची जाणीव लक्षात घेऊन मी शिवधनुष्य उचलले आहे. तुमच्या आधाराने चालत राहण्याचा निर्धार केला असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचाराची सांगता सभा आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारमधील प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा मी ताकदीने पुढे नेईन. दुःखाला कवटाळून न बसता जनसेवेसाठी मी उभी आहे, जोपर्यंत बारामतीकर माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही. मी एका संघर्ष योद्धय़ाची सहचारिणी आहे, येसूबाई जशा लढल्या, अहिल्यादेवींनी जसा कारभार चालवला, त्याच निष्ठsने कार्यरत राहीन.
अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहेत, त्याचे निरसन झाले पाहिजे. प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मी त्यासाठी भेट घेतली आहे. त्यांनी निष्पक्ष व सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आश्वस्त केले आहे. विविध यंत्रणांकडून तपास सुरू आहे. सत्य समोर आलेच पाहिजे. पण, काही चुकीचे समोर आले तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी, त्यात कोणतीही तडजोड सहन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, उदय सामंत, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, धनंजय मुंडे आदींची उपस्थिती होती.
अपघाताचे सत्य बाहेर येत नाही, तोवर निरोगी बसणार नाही – फडणवीस
अजितदादांच्या अपघाताबाबतचे सत्य बाहेर येत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आम्ही प्रचाराला आलो नसतो तरी बारामतीकरांनी विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार यांना निवडून दिले असते. परंतु हा अजितदादांच्या स्मृतीचा यज्ञ आहे. त्यात आहुती टाकली नसती तर त्याची रुखरुख आयुष्यभर मनाला लागली असती. बारामतीकरांनी रेकाॅर्डब्रेक मतदान करत सुनेत्रा पवार यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
हा दिवस येईल हे ध्यानीमनी नव्हते – सुप्रिया सुळे
आपल्या आयुष्यात हा दिवस येईल हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. घरातला कर्ता पुरुष, भाऊ गेल्याचे दुःख आयुष्यभर असेल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादांनी जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी 35 वर्षे या भागाची सेवा केली. बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अजितदादांच्या पश्चात आता विक्रमी मतांतून त्यांना श्रद्धांजली आणि सुनेत्रा वहिनी पवार यांना साथ द्या, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगता प्रचार सभेत केले.
Comments are closed.