‘बेस्ट’च्या ताफ्यात नव्या 500 गाडय़ा; प्रवाशांच्या ‘वेटिंग’ला लागणार ‘ब्रेक’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच तब्बल 500 बस दाखल होणार आहेत. विनावातानुकूलित या मिडी बेस्ट प्रशासन भाडे तत्त्वावर घेणार आहेत. यामुळे प्रवाशांचा गाडीसाठी होणारा ‘वेटिंग’ कालावधी कमी होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, बेस्टने या गाडय़ा भाडेतत्त्वावर न घेता स्वमालकीच्या घ्याव्यात अशी जोरदार मागणी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे या गाडय़ा भाडे तत्त्वावर घ्याव्यात की स्वमालकीच्या याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल, असे बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या गाडय़ांची संख्या कमी झाल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. स्टॉपवर पाच ते दहा मिनिटांत येणाऱ्या गाडय़ा तब्बल अर्धा ते एक तासानंतर  येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका या बस घेणार आहे. नऊ मीटर आकारातील सीएनजी आधारित या नॉन एसी बसमध्ये चालकाबरोबरच वाहकही असेल. दरम्यान, घेण्यात येणाऱ्या बस स्वमालकीच्याच घेण्याबाबतचा प्रस्ताव पुढील बैठकीत आणून अंतिम घ्यावा, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी प्रशासनाला दिले.

अशी आहे ‘बेस्ट’ गाडय़ांची स्थिती

सध्या बेस्ट उपक्रमात 249 मालकीच्या बस असून यामध्ये 37 बस महिलांसाठीच्या तेजस्विनी मिडी बस आहेत, तर भाडेतत्त्वावरील 625 मिडी बस आहेत.

विक्रोळी, भांडुप, पवई येथील टेकडीवरील परिसरात मिडी बस चालवण्यात येत होत्या. मात्र त्या बसेसना 15 वर्षे पूर्ण झाल्याने बेस्ट उपक्रमातून आऊट झाल्या.

मात्र नव्या बस अरुंद रस्ते, गल्ली अशा या ठिकाणी मिडी बसेस चालवणे अधिक उपयुक्त ठरणार आहेत. या बस खरेदीसाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

Comments are closed.