अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक

नाशिक : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खाडे प्रकरणी आता वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. अशोक खरातला आता 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावेळी नाशिक कोर्टाच्या परिसरात चांगलाच राडा झाल्याचं दिसून आलं. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्या आणि अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, त्याला कानाखाली वाजवतो अशी मागणी त्यांनी केली. त्याचवेळी, हे प्रकरण गेल्या वर्षीच बाहेर आलं असतं, पण पोलिसांनी सगळे पेन ड्राईव्ह गायब केल्याचा आरोपही त्यांनी केला.

अशोक खरातला मंगळवारी नाशिक कोर्टात दाखल करण्यात आलं. त्यावेळी नाशिक कोर्टाच्या परिसरात चांगलीच गर्दी झाल्याचं दिसून आलं. याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या कोर्टाच्या परिसरात आल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या भोवती कडे करून त्यांना रोखून धरलं.

अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या

तृप्ती देसाई यांनी अशोक खरातला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. अशोक खरातने जे काही कृत्य केलं आहे त्यावर त्याच्यावर कारवाई होईलच. पण राज्यातल्या अनेक महिलांची मागणी आहे की अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, त्याच्या कानाखाली वाजवू द्या, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.

अशोक खरातला जर गेल्या वर्षीच पकडलं असतं तर अनेक महिला या वाचल्या असत्या. पोलिसांनी अशोक खरातचे पेन ड्राईव्ह गायब केले नसते, तर अशोक खरातचे कृत्य मागच्याच वर्षीच समोर आले असते असा दावा तृप्ती देसाई यांनी केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये खरातचे पेन ड्राईव्ह आमच्याकडे येणार होते. पण आम्हाला जे पेन ड्राईव्ह देणार होते त्यांच्यावरच पोलिसांनी गु्न्हे दाखल केले. हे सगळं खरातला वाचवायला केलं गेलं असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक कोर्टात काळा बुरखा घालून कोर्टात आणण्यात आलं. अशोक खरात महिलांना पेढे खायला द्यायचा, त्यानंतर पाणी प्यायला द्यायचा. त्यानंतर त्या महिलांना मळमळ सुरू व्हायची अशी माहिती कोर्टातील युक्तिवादातून समोर आली आहे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवरून 31 काडतुसे आणि पाच पुंगळ्याही सापडल्या आहेत. याचा वापर कुठे करण्यात आला, हरणांची शिकार झाली का? या गोष्टींचा तपास सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. तसेच अशोक खरातने नरबळी दिले असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.