दुसऱ्या माळेला, श्री तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; ‘आई राजा उदे उदे’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील दुसऱ्या माळेनिमित्त सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. मातेच्या नित्योपचारांसह विविध धार्मिक विधी आणि पूजाअर्चा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाल्या. ‘आई राजा उदे उदे’, ‘बोल भवानी की जय’च्या गगनभेदी जयघोषाने अवघी तुळजाईनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त एका देवीभक्ताच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. विविध रंगांच्या सुगंधी फुलांनी सजलेले मंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. फुलांच्या वर्षावाने मंदिर परिसरात जणू भक्तीचा सुगंध दरवळत होता. या मनमोहक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील पुष्पसौंदर्य न्याहाळताना भाविक भारावून गेले. अनेकांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे प्रार्थना केली आणि सुख, समृद्धी व आरोग्याचे साकडे घातले.
भाविकांच्या गर्दीने तुळजाईनगरी गजबजली
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच विविध भागांतून भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होत आहेत. दुसऱ्या माळेच्या दिवशीही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देवीच्या जयघोषाने, घंटानादाने आणि भक्तांच्या अखंड मांदियाळीने मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. मातेच्या दर्शनाने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि मनात भक्तिभाव ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पारंपरिक छबिन्याने नवरात्रोत्सवाची शोभा वाढली
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी रात्री श्री तुळजाभवानी मातेच्या उत्सवमूर्तीचा पारंपरिक छबिना हत्ती वाहनावर काढण्यात आला होता. धार्मिक विधी, पारंपरिक पूजाअर्चा आणि भक्तिमय सोहळ्यांनी नवरात्रोत्सवाची शोभा अधिकच वाढवली आहे. शतकानुशतके चालत आलेली भक्तीची परंपरा, मातेवरील अढळ श्रद्धा आणि जयघोषाने भारलेले वातावरण यामुळे तुळजापूर नगरीत शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस अधिकच बहरत आहे.
आई तुळजाभवानीच्या चरणी लीन झालेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने तुळजाईनगरीत भक्तीचा जागर सुरू असून, फुलांच्या सुगंधासोबतच ‘आई राजा उदे उदे’चा जयघोष सर्वत्र घुमत आहे.
Comments are closed.