इंग्लंडमध्ये मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान संघात खळबळ; रिजवान- इमामला बाहेरचा रस्ता?

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी (ENG vs PAK) मालिकेत सलग दोन मोठे पराभव पत्करावे लागल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. संघाच्या खराब कामगिरीदरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिजवान (Mohmmed Rizwan & Imam ul-haq) आणि सलामीवीर इमाम-उल-हक यांना इंग्लंड दौऱ्यावरून परत पाकिस्तानमध्ये पाठवले जाऊ शकते. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पाकिस्तान संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर कठीण काळातून जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या पाकिस्तानचा पहिल्या कसोटीत इंग्लंडने लीड्स येथे एक डाव आणि 103 धावांनी पराभव केला. त्यानंतर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला 194 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
रिपोर्टनुसार, दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी, मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) सुमैर अहमद, पीएसएलचे सीईओ सलमान नसीर, माजी खेळाडू आणि वरिष्ठ निवडकर्ते आकिब जावेद तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन सहभागी झाले होते. असे सांगितले जात आहे की, या बैठकीत इंग्लंड दौऱ्यावरील संघाची कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये पाकिस्तान संघाची होत असलेली चर्चा याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. संघाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल उच्च पातळीवर नाराजी असल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
इमाम-उल-हक यांच्या स्थितीवरही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्यानंतर तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या दुखापतीबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 23 वर्षीय अब्दुल्ला फजल याला इंग्लंडमध्ये पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तानसाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत. या बैठकीत कसोटी संघाच्या कोचिंग व्यवस्थेवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्याकडे कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, हेसन इंग्लंड दौऱ्याच्या उर्वरित भागात संघासोबत राहू शकतात. जर हा निर्णय लागू झाला, तर पाकिस्तान संघात दौऱ्यादरम्यान मोठा बदल पाहायला मिळू शकतो. तसेच, कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांच्या भविष्याबद्दलचे प्रश्न आणखी गंभीर होतील.
Comments are closed.