तामिळनाडूच्या मदुराईमध्ये दोन बसची धडक, 5 ठार

मदुराई:

मदुराई जिल्ह्यात सोमवारी सकाळी दोन बसेसची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 42 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चेन्नईहून मार्थांडमच्या दिशेने जात असलेली खासगी बस कोट्टामपट्टीनजीक महामार्गावर अचानक अनियंत्रित झाली. बस दुभाजक ओलांडून समोरील मार्गिकेत पोहोचली आणि मदुराईहून तिरुचिरापल्लीच्या दिशेने जाणाऱ्या सरकारी बसला जाऊन धडकल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. धडक अधिक तीव्रतेची असल्याने खासगी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तर सरकारी बस पलटली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी तेथे धाव घेत बसेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या दुर्घटनेत 4 पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments are closed.