एव्हरेस्टवरून उतरताना दोन भारतीयांचा मृत्यू

अत्याधिक थकव्यामुळे धाप लागल्यानंतर मृत्यू : शेर्पा बचाव पथकाचे बचावाचे प्रयत्न निष्फळ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माउंट एव्हरेस्ट सर केलेल्या दोन भारतीय गिर्यारोहकांचा परतीचा प्रवास करताना मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ एक्सपेडिशन कोऑर्डिनेटर्स असोसिएशनचे सरचिटणीस ऋषी भंडारी यांनी शुक्रवारी दिली. गिर्यारोहक अरुण कुमार तिवारी आणि संदीप आरे हे एव्हरेस्टवरून खाली उतरताना अत्यंत थकले होते. अतिथकव्यामुळे त्यांना धाप लागली होती, असे भंडारी यांनी सांगितले. संदीप आरे यांनी बुधवारी एव्हरेस्ट शिखर सर केले होते, तर अरुण तिवारी यांनी गुरुवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास शिखर सर केले होते. अरुण तिवारी यांचा हिलरी स्टेपजवळ मृत्यू झाला. तर संदीप आरे यांना शेर्पा बचाव पथकाने कॅम्प 2 मध्ये आणले. कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.

संदीप आरे यांच्यासह तीन भारतीय गिर्यारोहकांनी बुधवारी 8,848.86 मीटर उंचीचे शिखर सर केले होते. इतर दोन गिर्यारोहक तुळसी रे•ाr पालपुनुरी आणि अजय पाल सिंग धालीवाल हे सध्या तंदुरुस्त आहेत. दुसऱ्या दिवशी गुरुवारी भारतीय गिर्यारोहक अरुण तिवारी आणि लक्ष्मीकांत मंडल शिखरावर पोहोचले होते. एव्हरेस्टवरील वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या धोक्यांबद्दल तज्ञ वारंवार सावधानतेचा इशारा देत आहेत.

एव्हरेस्टवर विक्रमी गर्दी

एव्हरेस्ट पर्वताच्या नेपाळी बाजूने एका दिवसात सर्वाधिक गिर्यारोहकांचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या नव्या विक्रमाच्या नोंदीनुसार, एकाच दिवसात 274 गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले आहे. हवामान स्वच्छ झाल्यानंतर आणि बर्फ वितळल्यानंतर बुधवारी सकाळी सुरू झालेली ही मोहीम 11 तास चालली.

नेपाळ पर्यटन विभागाचे अधिकारी खिमलाल गौतम यांच्या मते, बुधवारी 274 जणांनी एव्हरेस्ट सर केले. यापूर्वी, 22 मे 2019 रोजी नेपाळी बाजूने 223 गिर्यारोहकांनी एव्हरेस्टचे शिखर सर करून एक विक्रम प्रस्थापित केला होता. यावर्षी, आतापर्यंतच्या सर्वाधिक, जवळपास 500 परदेशी गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये गिर्यारोहकांच्या लांबच लांब रांगा एव्हरेस्टच्या ‘डेथ झोन’पर्यंत पोहोचल्याचे दिसत होते. समुद्रसपाटीपासून 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील प्रदेशाला ‘डेथ झोन’ (मृत्यू क्षेत्र) म्हणून ओळखले जाते, जिथे ऑक्सिजनची अत्यंत कमतरता असते. नेपाळ सरकारने सप्टेंबर 2024 पासून एव्हरेस्ट परवान्याचे शुल्क 11,000 डॉलरवरून 15,000 डॉलरपर्यंत वाढवले असूनही एव्हरेस्ट पर्यटन तेजीत आहे.

Comments are closed.