झुरळाचे अर्धे अनुयायी पाकिस्तानी आहेत का?
विविध देशांसंबंधीची आकडेवारी आता झाली उघड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेला आठवडाभर सोशल मिडियावर सनसनाटी माजविलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या गटाचे खरे स्वरुप आता उघड होत आहे. मूळचा पुण्याचा असलेला आणि आता शिक्षणासाठी अमेरिकेत असलेला अभिजित दिपके हा या गटाचा संस्थापक आहे. या गटाने सोशल मिडियावर 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळवून मोठा धमाका केला आहे. तथापि, या फॉलोअर्सपैकी केवळ 9 टक्के भारतीय नागरीक आहेत. तर पाकिस्तानी नागरीकांची संख्या 49 टक्के आहे.
ही आकडेवारी आता प्रसिद्ध झाली आहे. पाकिस्तानच्या 49 टक्के फॉलोअर्सशिवाय अमेरिकेचे नागरीक 14 टक्के या प्रमाणात आहेत. तर बांगला देशचे नागरीकही 14 टक्के आहेत. तुर्कियेचेही नागरीक मोठ्या प्रमाणात या गटाचे फॉलोअर्स झाले आहेत. अशा प्रकारे 91 टक्के फॉलोअर्स विदेशी नागरीक आहेत. भारतातल्या फॉलोअर्सची संख्या अत्यल्प असून ते नेमके कोणत्या समाजघटकाचे आहेत, याची देखील चर्चा आता होत आहे. ही ‘कॉक्रोच जनता पार्टी नसून ‘पाकिस्तान जनता पार्टी’ आहे, अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे महासचिव बग्गा यांनी शुक्रवारी पत्रकारांसमोर केली आहे.
आकडेवारी सोशल मिडियावर
कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची ही धक्कादायक आकडेवारी देशांच्या नावांसकट आता सोशल मिडियावर प्रसिद्ध होत आहे. या आकडेवारीवरुन हे पाकिस्तानचे कारस्थान आहे, असा आरोपही केला जात आहे. हे आरोप खरे असतील, तर हे प्रकरण हा ‘पक्ष’ आणि त्याचा संस्थापक दिपके यांच्यावर चांगलेच शेकू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली असून भारताची सुरक्षा धोक्यात आणण्याचे हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याची शक्यता बोलून दाखविली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी भारताच्या गुप्तचर संस्थांकडून होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दिपकेकडून आरोपाचा इन्कार
कॉक्रोच जनता पार्टी आणि दिपके यांनी आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या गटाच्या फॉलोअर्सपैकी 94 टक्के भारतीय नागरीक आहेत. तर अमेरिकेचे नागरीक केवळ 1 टक्का आहेत. आपल्या ‘पक्षा’ला मिळणारा पाठिंबा पाहून आपणही थक्क झालो आहोत, असे दिपके यांचे म्हणणे दिसून येत आहे.
बनावट खात्यांची शक्यता
दिपके याच्या गटाला मिळणारा ऑन लाईन पाठिंबा बनावट असल्याची शक्यता अनेक इंटरनेट युजर्सनी व्यक्त केली आहे. ‘बॉट’ किंवा विदेशांमधील निष्क्रीय खात्यांचा असू शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि सूत्रधार समोर यावेत, अशीही मागणी केली जाऊ लागली आहे.
काही राजकारणी समर्थक
सीजेपीच्या फॉलोअर्समध्ये भारतातील काही राजकारणीही समाविष्ट झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि सागरीका घोष, तसेच गुल पनाग आणि प्रशांत किशोर आदी मान्यवर फॉलोअर्स बनल्याचे वृत्त आहे. दिपके हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हस्तक आहे, असा आरोपही आहे.
मेटा, इन्स्टाग्रामचे अद्याप मौन
मेटा आणि इन्स्टाग्राम या सोशल मिडिया कंपन्यांनी अद्याप अधिकृत आकडेवारी घोषित केलेली नाही. या कंपन्या नेमकी आकडेवारी देऊ शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास हा काय प्रकार आहे, हे स्पष्ट होऊ शकते, असे मत कित्येक संगणकतज्ञांनीही व्यक्त केलेले आहे.
फॉलोअर्ससंबंधी मोठा विवाद
ड सीजेपीच्या फॉलोअर्ससंबंधी मोठ्या प्रमाणात विवाद, चौकशीची मागणी
ड आकडेवारीविषयी परस्परविरोधी दावे, विदेशी शक्तींच्या हाताचा आरोप
ड असंख्य फॉलोअर्स हे बनावट असल्याची शक्यताही तज्ञांकडून व्यक्त
ड भारतातील काही राजकारणी आणि विचारवंत या गटाचे झाले फॉलोअर्स
Comments are closed.