रिझर्व्ह बँक केंद्राला मोठा लाभांश देते
2.87 लाख कोटी रुपयांची भर, अर्थव्यवस्थेला हातभार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला यंदाच्या वर्षीचा लाभांश म्हणून 2.87 लाख कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. हा लाभांश आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याने हा नवा विक्रम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, हा लाभांश यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील अनुमानापेक्षा कमी आहे. मात्र, आखातातील युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला निर्माण झालेल्या समस्येचा विचार करता तो मोठा असून त्याचा उपयोग अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाची अपेक्षा 3.16 लाख कोटी रुपयांची होती. ती पूर्ण झाली नसली तरी जो लाभांश दिला गेला आहे, तो समाधानकारक मानला पाहिजे, असे तज्ञांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेच्या जमाखर्चानुसार यंदा या मध्यवर्ती बँकेच्या उलाढालीत 20.61 टक्क्यांची वाढ झाली असून ती 91.97 लाख कोटी आहे.
उत्पन्नात वाढ
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेचे ढोबळ उत्पन्न 26.42 टक्क्यांनी वाढले आहे. तर रिस्क प्रोव्हिजनच्या आधीचा खर्चही 27.60 टक्क्यांनी वाढला आहे. 31 मार्च 2026 पर्यंत बँकेची उलाढाल 91 लाख 97 हजार 121.08 कोटी रुपये असल्याचे बँकेच्या ताळेबंदावरुन दिसून येत आहे. बँकेने रिस्क प्रोव्हिजनसाठी तिजोरीत 1 लाख 9 हजार 379 कोटी रुपये ठेवले आहेत. गेल्या वर्षी ही रक्कम केवळ 44,861.70 कोटी रुपये होती. सीआरबीसाठीही बँकेने आपल्या ताळेबंदाच्या 6.5 टक्के इतकी तरतूद केली आहे.
तरीही अपुरी रक्कम
रिझर्व्ह बँकेने यंदा विक्रमी लाभांश दिला असला, तरी तो वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठण्यासाठी अपुरा आहे, असे तज्ञांचे मत आहे. सध्या आखातील युद्धस्थितीमुळे जगाच्या बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारताला तेलाच्या आयातीसाठी अधिक डॉलर्स खर्च करावे लागत असून त्यामुळे व्यापारी तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने रिस्क प्रोव्हिजनसाठी अधिक रकमेची तरतूद करण्याचे योग्य पाऊल उचलले आहे, असे अर्थतज्ञांनी स्पष्ट केले. एकंदरीत, हा लाभांश सध्याची आवश्यकता भागविण्यास सक्षम असला तरी दीर्घकाळाचा विचार करता केंद्र सरकारला आपल्या उत्पन्नासाठी मुख्यत्वेकरुन या लाभांशापेक्षा करसंकलनावर अवलंबून रहावे लागेल. तोच उत्पन्न वाढविण्याचा खरा मार्ग आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Comments are closed.