तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे;अमित ठाकरेंच्या पत्रावर उदय सामंतांचा टोला

रत्नागिरी: मनसेचे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra modi) पत्र लिहून देशभरात सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपण जिंकलेलं नाही, तर या युद्धजन्य परिस्थितीला युद्धविराम मिळाला आहे. त्यामुळे, हा जल्लोष करणे योग्य नसल्याचे सांगत अमित ठाकरे यांनी भाजपकडून सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत हा जल्लोष थांबवण्याची विनंतीही केली आहे. आता, शिवसेना नेते आणि मंत्री उदय समंत यांनी अमित ठाकरेंच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे. तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नसून भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅली काढली जात असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली आहे, असेही सामंत म्हणाले. दरम्यान, युद्ध अजून संपलेलं नाही… अशा मथळ्याखाली अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

ठाकरे गटाने जबाबदारी दिलेले किती लोक त्यांच्यासोबत निवडणुकीपर्यंत राहतील मी पाहतो आहे, कितीही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली तरी मी दाव्याने सांगतो की मुंबई महानगरपालिकेपासून ते थेट रत्नागिरी नगरपरिषदेपर्यंत ते सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची सत्ता येईल, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

गोगावलेंचा टॉवेल कायम खांद्यावर

दरम्यान, सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची नक्कल केली होती. याप्रकरणी उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. भरतशेठ गोगावले यांच्या खांद्यावर रुमाल नसतोच, गोगावले यांचा रुमाल वर्षानुवर्षे खेळमध्ये असतो. खांद्यावर रुमाल टाकणारा नेता कोण आहे हे मला शोधावे लागेल. अजून कितीही निवडणुका झाल्या तरी भरत शेठ गोगावले तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आमचे भरतशेठ आत्मविश्वासानं टॉवेल काखेत ठेवतात. त्यामुळे, भरत शेठ गोगावले यांची नक्कल केली असे मी मानत नाही. कारण ते कधीच खांद्यावरती टॉवेल टाकत नाहीत, असे सामंत यांनी म्हटले.

हेही वाचा

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, रोहित पवार अन् जयंत पाटलांना राज्यात संधी; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..

Comments are closed.