हुकूमशाहीचा पोलादी पाश आवळण्यासाठी यांची फोडाफोडी सुरू; उद्धव ठाकरे यांनी डागली तोफ
‘ठाकरे संपला तर या महाराष्ट्रातून प्रश्न विचारणारा दुसरा कुणी राहणार नाही; म्हणून यांना ठाकरे संपवायचे आहेत! तसेच यांना हुकूमशाहीचा पोलादी पाश आवळ्यासाठी यांची फोडाफोडी सुरू आहे, पण फोडाफोडी करणाऱ्यांना कसं फोडायचं हे जनतेनं ठरवायचं’, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गद्दारांवर बरसले. शिर्डीतील मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विकास निधीच्या कमतरतेची कारणे देणाऱ्या गद्दारांना साईबाबांचं उदाहरण देत जोरदार चपराक लगावली. ‘विकासनिधीच्या गप्पा शिर्डीत नका सांगू, गरीबाच्या घरात तेल नसताना पाण्याने दिवा पेटवला साईबाबांनी पेटवला आहे. ही शक्ती आपण साईबाबांकडून घेतली पाहिजे. अरे असेल समोर सत्ता, असेल पैसा पण मी जे काम करतो त्यावर माझी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचं फळ मिळण्या इतकी सबुरी माझ्याकडे आहे’, असं म्हणत पक्षातून पळून जाण्याच्या गद्दारांच्या खोट्या कारणांमधील हवाच काढून टाकली.
शिर्डीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या भाषणापूर्वी सूचना झाली की गाडीची चावी हरवली आहे. सापडली तर आणून द्या. मी एक सूचना करतो, खासदार हरवला आहे. सापडला तर सोडू नका. आणि तो खासदार अजिबात परत आणू नका. आता जग असे झाले आहे, विश्वास ठेवायचा तरी कुणावर? काही काहींच्या नसा नसांत आणि रक्तात गद्दारी भरली असते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे. हा खाऊसाहेब आहे जाऊ तिथे खाऊ. काही कार्यकर्ते मला भेटले आणि म्हणाले की साहेब हा शुभशकून आहे. या गद्दाराला आपण 2009 साली निवडून दिले होते. आणि 2014 ला हा पळाला होता आणि आपलं सरकार आलं होतं. असं असेल तर आधीच याला पळवलं असतं. पण हे जिथे जातात तिथे बट्ट्याबोळ होतो. काँग्रेसमध्ये गेले त्यांचं सरकार पडलं. आता शहासेनेत गेलेत, त्यांचंही सरकार पडणार. कारण ही साईबाबांची पवित्र शिर्डी आहे. इकडे श्रद्धा आणि सबुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठेतरी श्रद्धा असावी लागते. जशी आपली श्रद्धा आपल्या कामावर, भगव्यावर आहे. तशी यांची कुणावरच श्रद्धा नाही. रोज नवीन बाप असतो यांचा आणि सबुरीचा तर पत्ताच नाही. त्यावेळेला थांबला असता तर केंद्रात आपलं सरकार आलं होतं. आता थांबला असता तर उद्या येणारं सरकार आपलं आहे. काही काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. कारण आपण म्हणतो जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळे भविष्यात आपल्याला चांगले दिवस तेव्हा अशा भ्रष्ट विचाराचे गद्दार आपल्यासोबत राहता कामा नये म्हणूनच त्यांनी दुर्बुद्धी किंवा सुबुद्धी त्यांना देवाने दिली असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यावर आणि देशावर जे संकट आलेलं आहे, हे संकट आणि आरिष्ट लवकर दूर कर, ही भ्रष्ट राजवट तोडून गाडून टाक अशी साईचरणी मी आज प्रार्थना केली. देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचे रक्षण कर अशीही साईचरणी मी प्रार्थना केली. कारण त्यांचा पत्ता कापला जाणार आहे. मी कुणाचाही वाईट चिंतणारा नाही. कुणाचं वाईट व्हावं आणि आपलं भलं व्हावं ही दुर्बुद्धी मला कधी सुचलेली नाही आणि ती सुचू नये अशी प्रार्थनाही साईचरणी मी केलेली आहे. पण प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो. त्यामुळे 2029 नंतर कोण आणि आपल्याला वाली कोण अशी चर्चा दिल्लीत भाजपमध्ये सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आशेचे अंकूर फुटायला लागले आहेत. त्यामुळे कुणालातरी वाटायला लागले आहे की या शर्यतीत देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. त्यामुळे त्यांना त्रास देऊन फडणवीस दिल्लीत येताच कामा नये असे प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधानांच्या शर्यतीत कोण कोण आहे हे तुम्हाला माहित आहे. त्यांनी शहासेनेच्या प्रमुखाला फडणवीसांना इथल्या इथे गुंतवण्याची सुपारी दिली आहे. जर खासदार फोडायचे आहेत तर ते आपल्या पक्षात घेणार की भलत्याच्या पक्षात टाकणार? स्वतःच्याच पक्षात घेणार कारण स्वतःचे खासदार वाढले पाहिजेत. 2019 साली शिवसेनेचे 18 खासदार आपले निवडून आले होते, तर भाजपचे 21 खासदार निवडून आले होते. युती तुटल्यानंतर आपले 9, भाजपचे 9 आणि शहासेनेचे 6 खासदार निवडून आले होते. मग शहासेनेने शिवसेनेचे खासदार फोडून आपल्या पक्षात घेतले. म्हणजे महाराष्ट्रात आज भाजपपेक्षा शहासेनेची ताकद वाढली. आता उद्या पंतप्रधानपदाला मतदान करण्याची वेळ येईल तेव्हा शहासेना कुणाला मतदान करणार? हिशोब सरळ आहे. मग त्यावेळेला फडणवीसांना सांगतील की तुम्ही गप्प बसा. तुमच्या नेतृत्वाखाली 9 खासदार निवडून आले होते, शहासेनेचे जास्त खासदार आहेत. अशी शहासेनेची चाल आहे. मिंधे म्हणतात की आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलू शकत नाही, बोलले तर लोक जोड्याने मारतील. जेव्हा तुम्ही साईबाबांचे दर्शन घ्यायला जाता तेव्हा तुमचे लक्ष साईबाबांकडे असतं नैवेद्याकडे नाही. या खाऊसाहेबाचे लक्ष नैवेद्याकडे होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मला पत्रकार म्हणतात की आता हे खासदार तुम्हाला सोडून गेले, जेव्हा तुमच्यासोबत होते तेव्हा तुम्ही त्यांच्याबाबत का नाही बोलले? एक बाब प्रामाणिकपणे कबूल करतो की, चूक माझी आहे. पण मला याबाबत आधी कुणीही सांगितलं नव्हतं. 2014 ला हे खाऊसाहेब काँग्रेसमध्ये गेले. 2024 ला ज्यांनी शिवसेनेत त्यांना आणले तेच आता मिंधे गटात गेले. ही शिवसेना पोकळ विचारांची नाही. साधे शेतकरी शिवसैनिक सांगत होते की आम्ही पदरमोड करून आम्ही वाकचौरेंनानिवडून आणले होते. समोर पैश्यांचा धबधबा असूनही आम्ही आमच्या खिशातले पैसे खर्च करून या वाकचौरेंना निवडून आणलं होतं. साधे शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
या खाऊसाहेबांना 15 कोटी रुपयांचा विकासनिधी मिळाला होता. त्यातले फक्त 70 लाख रुपये त्यांनी खर्च केले होते. 135 कामांपैकी फक्त दोन कामं झाली होती. पत्रकारांनी आपल्या चॅनेलवर हे सांगितलं होतं. मग विकासनिधीचा प्रश्न येतो कुठे? असं असताना विकासनिधी मिळत नाही अशा थापा कुणाला मारताय? आणि विकासनिधी जर मिळत नसेल तर हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. याचा अर्थ असा नाही की, फक्त भाजपच्याच उमेदवारांना मत द्या आणि इतर उमेदवारांना मत देऊ नका. हा विकासनिधी हा करदात्यांचा हक्काचा पैसा आहे. पण सगळा नेभळट कारभार सुरू आहे. फक्त फुटाफुटीचे दिवस आले आहेत. ज्यावर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून आहे तो नीटचा पेपर फुटला आहे. शेतकरी एवढा कर्जबाजारी झाला आहे की नांगरायला त्याच्याकडे बैल नाहिये. त्याला पत्नीला नांगराला जुंपून शेती करावी लागते. आणि हे सगळे नालायक, नीच राजकारणी खासदार फोडायला हे पैसे वापरत आहेत. बातमी आल्यावर सरकारने बैल दिला. बैल देण्याऐवजी फुटलेला एखादा खासदार दिला असता तरी त्या शेतकऱ्याचे काम झाले असते. एखादा मंत्री दिला असता तरी त्याने नांगर ओढला असता एवढे हे लोक माजले आहेत. पण सरकारने दिलेल्या बैलावर शेतकऱ्याने जोखड ठेवलं तेव्हा तो बैलच खाली बसला. शहा सेनेला पैशांचा भार पेलवत नाही म्हणूनच ते खासदार फोडत आहेत. नीटचे पेपर फुटले तिथे जंतर मंतरला उपोषणाला बसले आहेत. तिथे कुणीही फिरकायला तयार नाहीत. काल ठाण्यात TET चा पेपर फुटला. पेपर फुटत आहेत, खासदार फुटत आहेत पण तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाहिये?
शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणू जगा. आता शिवसेनेचा राग म्हणजे काय असतो हे दाखवा. 40 आमदार फोडले तेव्हा म्हणायला लागले की शिवसेना संपली. तरी त्यांच्या उरावर 9 खासदार निवडून आणले. पण त्यातले 6 खासदार फोडले. संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचा मला अभिमान आहे. यांनाही मंत्रिपदाच्या ऑफर आल्या होत्या. राजाभाऊ वाजे यांचे वडिल प्रकाशभाऊंनी सांगितले की आम्ही घरी बसू पण ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली, ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी आम्ही गद्दारी नाही करणार. याला म्हणतात निष्ठा. याला म्हणतात श्रद्धा आणि सबुरी.
काल मला धाराशिवमध्ये तलवार दिली. तेव्हा मला आठवलं की छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी लढायला आई भवानी देवीने तलवार दिली होती. पण तेव्हा महाराजांनी विचार केला असता की हा औरंगजेब एवढा बलाढ्य आहे, त्याच्याकडे एवढं सैन्य आहे. पैसा आहे पण माझ्याकडे निधी नाही. मी पण जातो औरंगजेबाकडे. तर आपण राहिलो असतो का? महाराज स्वाभिमानाने स्वराज्यासाठी लढले. मूठभर निष्ठावंत मावळ्यांसोबत त्यांनी औरंगजेबाला त्यावेळी टक्कर दिली होती. पसाभर गद्दार आहेत पण त्याचा उपयोग नाही. पण वज्रमुठ असलेले निष्ठावान आहे. ही वज्रमूठ जर त्या पसाभर गद्दारांना मारली तर ते गद्दार नेस्तनाबूत होतील. हा इतिहास आपल्याला महाराजांनी शिकवलेला आहे.
हे फोडाफोडाची राजकारण आहे. हे राजकारण फक्त शिवसेना फोडण्याइतपत नाहिये. इथे शिवसेना फोडली, शहासेनेत टाकली. तिकडे ममता बॅनर्जींची तृणमूल फोडली, भलत्याच पक्षात टाकली. आप फोडली. हे सगळं कारस्थान देशाच्या गळ्याभोवती हुकुमशाहीचा पोलादी पाश आवळण्यासाठी सुरू आहे. अब की बार 400 पारचा लोकसभा निवडणुकीत नारा दिला होता, कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं होतं. आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. कारण त्यांच्या 400 पारचं स्वप्नाचं महाराष्ट्राने चुराडा केला. त्यांच्या नाकावर टिच्चून महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून दिले. त्यानंतर त्यांनी एक विधेयक आणलं होतं. त्याला महिला आरक्षणाचा मुलामा दिला होता. दररोज महिलांवर अत्याचार होत आहे, आपले मुख्यमंत्री हतबल आहेत. कारण वरून त्यांना आवळून ठेवलं आहे, त्यामुळे हलताच येत नाही. कारण त्यांनाही कळलंय की त्यांची खुर्ची जाणार आहे, त्यांना अडगळीत फेकणार आहेत. स्वतः मुख्यमंत्र्याकडे गृहखाते आहे तरी दररोज कुणावर तरी अत्याचार होत आहेत. या महिला अत्याचारांबाबत कुणीही बोलत नाहिये. पण महिला आरक्षणावर बोलत आहेत. आज आरक्षण द्या. आज लोकसभेतील 550 खासदारांमध्ये त्यांना आरक्षण द्या. मग जेव्हा या जागा 1000 हजारो होतील तेव्हा बघू. पण महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला. त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत नसल्याने हा प्रयत्न आपण हाणून पाडला. आता हे सगळे खासदार फोडून, ते विधेयक अधिवेशनात आणून मंजूर करतील. जेणेकरून माझ्या महाराष्ट्राचा दक्षिणेचा आवाज संसदेत उठला तरी त्याची किंमत राहणार नाही. संपूर्ण राज्य उत्तरेच्या हातात जाईल. हा महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर होणारा हल्ला आहे. असे अनेक खाऊसाहेब आले आणि गेले. शिवसेना ही फक्त आमदार आणि खासदारांसाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना ही महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मराठी माणसासाठी आणि गोरगरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी जन्माला आलेली आहे.
यांना ठाकरे का संपवायचा आहे, कारण एकदा ठाकरे संपले की महाराष्ट्रातून ठाकरे संपले की यांना प्रश्न विचारणारे कुणीच उरणार नाही. पण त्यांना हे माहित नाही की फक्त उद्धव ठाकरेच नाही तर महाराष्ट्राच्या मनामनात बाळासाहेब ठाकरे जिवंत आहेत. उद्धव ठाकरे ही व्यक्ती आहे, पण बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकच त्यांची जागा कुणी घेऊ नाही शकत. ती एक आग आहे. त्यांना खंत आहे की एवढं करूनही मला कुणी हिंदुहृदयसम्राट का म्हणत नाहीत? कारण तुम्ही बोगस आहात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे विचार आहे आणि तो विचार स्वाभिमानाच्या रूपाने हिंदू आणि मराठी माणसांच्या विचारांत भिनला आहे. तो अशा कितीही शहासेना आल्या तरी तो उखडून बाहेर काढू शकत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पक्षी नाही तर माझे पंख कसे छाटणार. ही मराठी म्हण आहे. मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून मराठी भाषा शिका. त्या नार्वेकरांना मराठी उच्चार येत नाही, आणि हे आमच्या पक्षाचे निर्णय देणार. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाला ज्याला मराठी नीट येत नाही, तो महाराष्ट्राचा कारभार करतोय, तो शिवसेनेच्या भवितव्याचा निर्णय देतोय आणि आम्ही गपगुमान त्या खुर्चीचे आदेश मानतोय यासारखं दुर्दैवं नाही. मुख्यमंत्र्यांना हे कळलंय पण पचत नाहीये. कधी कधी असं होतं की सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था झाली आहे. कारण हे स्वतःच्या ताकदीवर हे मुख्यमंत्री झालेले नाही. वरच्यांच्या मर्जीने, मेहरबानीने हे मुख्यमंत्री झाले आहेत. जसे आपण साईबाबांच्या चरणी लीन होतो, तसे हे दिल्लीश्वरांच्या चरणी लीन आहेत.
मला आज प्रश्न विचारला की शिवसेनेला पुनर्बांधणीची गरज आहे का? मी म्हटलं शिवसेनेला नव्हे तर भाजपला पुनर्बांधणीची गरज आहे. जेवढ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरादारावर निखारे ठेवून भाजप भाजप म्हणून पक्षाची पुनर्बांधणी केली, ते सगळेच्या सगळे या गद्दारांच्या पायाखाली लोळत आहेत आणि चटाया उचलत आहेत. त्यामुळे भाजपला पुनर्बांधणीची गरज आहे. या भाजपला पोरं होत नाहीत त्यात माझा काय दोष आहे? इथे एक खासदार पळून गेला तर आम्ही दुसरा निवडून आणू. नेऊन नेऊन किती पळवाल? कारण आमच्या पक्षाची बांधणी ही पैशांवर, उपऱ्या लोकांवर झालेली नाहिये. आमच्या पक्षाची बांधणी ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या स्वाभिमान आणि मराठी अस्मितेचा धागा दिला आहे, त्यातून झालेल्या बांधणीतून ही बांधणी झाली आहे. हाच आपल्या आणि भाजपमध्ये फरक आहे.
जी गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत झाली तीच बाब नितीन गडकरींच्या बाबतीत झाली होती. कारण फडणवीस आणि गडकरींना संघाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष झाले होते. फडणवीस मुख्यमंत्री झाले. एक प्रश्न मी संघाला विचारतो की, तुम्हाला जी व्यक्ती पंतप्रधानपदी हवी आहे म्हणून ही छाटाछाटी सुरू आहे का? या प्रश्नाचे उत्तर संघाने द्यावे. कारण नड्डांनीही मागे म्हटलं होतं की, आता भाजपला संघाची गरज नाही. ही सगळी मारामारी लक्षात घ्या.
फक्त पेपर फुटत नाहीत तर विद्यार्थ्यांचे नशीब फुटत आहेत. नीटचा पेपर फुटला, जय श्री राम. TET चा पेपर फुटला जय श्री राम. दुष्काळ पडला, जय श्री राम. शेतमालाला हमीभाव नाही, जय श्री राम. हे आमचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम, शेतमालाला दाम. घर पेटवणारं नव्हे तर घरातली चूल पेटवणारे हे आमचं हिंदुत्व. आणि ते होऊ नये, मराठी माणसांमध्ये भांडण लावण्यासाठी या सुपारीसेना काढल्या आहेत. आपलीच लोकं फोडतात आणि आपल्यावरच सोडतात. आपण भांडत सोडणार आणि हे लोक राज्य करत बसणार. यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी मला इथला खासदार हवा आहे. देशाचा पंतप्रधान कोणीही झाला तरी त्याच्यासमोर छातीठोकपणे महाराष्ट्राचा प्रश्न मांडणारा मला इथला शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून पाहिजे.
फोडाफोडी करणाऱ्यांना कसं फोडायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. आमच्याकडे श्रद्धा आहे, सबुरीही आहे. पण जे लोक बुरी आहेत, त्यांचं काय करायचं हे सुद्धा साईबाबांनी सांगितलेलं आहे. आणि विकासनिधीच्या गप्पा शिर्डीत नका सांगू. गरीबाच्या घरात तेल नसताना पाण्याने दिवे पेटवले म्हणून त्यांना आम्ही साईनाथ की जय म्हणतो. असेल समोर पैसे, सत्ता. पण माझ्याकडे श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचं फळ मिळण्यासाठी माझ्याकडे सबुरी आहे. यामध्ये जो कोणी येईल त्याला तुडवण्याची ताकद मला साईबाबाने दिली आहे, हा आत्मविश्वास घेऊन पुढे चला.
लोकसभा निवडणुकीसाठी अजून तीन वर्ष आहेत. त्यापूर्वीच हा शुभशकून झाला आहे. कदाचित न जाणो, साईबाबांच्या मनात असेही असेल, की या तीन वर्षात ते सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल. जोवर आपल्या शिवसेनेचा खासदार निवडून येत नाही, तोवर शांत बसायचं नाही. ज्या मशालीच्या चिन्हातून गद्दाराला निवडून दिलं. त्या मशालीची धग ही त्या गद्दारांना दाखवून द्या, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
Comments are closed.