उद्धव ठाकरे यांचा आजपासून झंझावाती दौरा, गद्दार खासदारांच्या मतदारसंघात धडक
शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांविरोधात महाराष्ट्रात प्रचंड चीड आणि संताप असून, ज्या मतदारांनी या खासदारांना निवडून दिले त्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झंझावाती दौऱ्यावर निघाले आहेत. उद्या यवतमाळ येथून या तीन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी आज मुंबईतून उद्धव ठाकरे रवाना झाले. नागपूर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गद्दारांविरोधात यावेळी संतप्त घोषणा देण्यात आल्या.
मशाल चिन्हावर जिंकणाऱ्या सहा खासदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली. या सहाही मतदारसंघांतील मतदारांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार असून ईशान्य मुंबईपासून त्याची सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत भांडुप आणि घाटकोपर येथे गद्दार खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशीव आणि शिर्डी येथे धडक देणार आहेत.
नागपूर विमानतळावर भव्य स्वागत
उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर आज जंगी स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांची तुफान गर्दी उसळली होती. ‘संकटांशी न डगमगता लढणारा फक्त एकच नेता’ असे फलक हाती घेऊन शिवसैनिकांनी अखंड जयघोष केला. यावेळी गद्दारांविरोधात प्रचंड चीड दिसली. गद्दारांविरोधात घोषणा देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. नागपूर विमानतळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनकांनी भव्य स्वागत केले.
जनतेशी संवाद
संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओम निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे या गद्दार खासदारांच्या मतदारसंघांतील जनतेशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई हे त्यांच्यासोबत असणार आहेत.
शिवसेना कुणीही संपवू शकत नाही!
विमानतळाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. कुणाच्या कितीही पिढय़ा उतरल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही. तुमच्यामुळे शिवसेना आहे आणि शिवसेना राहील. जे जे शिवसेनेच्या मुळावर येतील तेच संपतील, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. नागपुरात लवकरच मेळावा घेणार असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचा एकाच विमानातून प्रवास
मुंबई ते नागपूर हा प्रवास आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून केला. आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे अन्य नेते उद्धव ठाकरे यांच्यासमवेत विमानात होते. विमानात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूसही केली.
यवतमाळ सकाळी 10.30 किंवा.
वाशीम दुपारी 2 किंवा.
हिंगोली सायंकाळी 4 किंवा.
Comments are closed.