मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं, पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजीचा
मुंबई: आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच मुंबईतील निवडणुकीच्या तयारासाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचे या माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीपासून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवलं जात नसल्याने अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदार संघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशी स्पष्ट तक्रार एका नगरसेवकाने बैठकीत केल्याचे समजते.
ठाकरेंचे अनेक नगरसेवक भाजपच्या गळाला लागणार?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत होते. मात्र, आता शिंदे गटाऐवजी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
2017 साली ठाकरे गटाचे निवडून आलेले एकूण नगरसेवक – 84 + मनसेचे 6 नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला + 2 नगरसेवक कोर्टातील प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले + शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेला 7 अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अशी सर्व बेरीज करुन शिवसेनेकडे एकूण नगरसेवक 99 नगरसेवकांचे पाठबळ आहे. तर शिंदे गटात गेलेले नगरसेवक – 36. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष अशा माजी नगरसेवकांचा समावेश आहे
भाजप सोडून गेलेल्या नेत्यांना घरवापसीचे वेध
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. तिकीट मिळवण्यासाठी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. साथ सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. परतीचे वेध लागलेल्यांना पक्षात घ्यायचे की नाही याबाबत भाजपमध्ये अद्याप निर्णय नाही. कोकणातील एका नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील देखील भाजपमध्ये परतण्यास इच्छूक आहेत. तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून गेलेले समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांच्यासारख्या काही महत्वाच्या नेत्यांच्या भूमिकेकडेही आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.