‘प्रहार’चे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत, बच्चू कडू यांना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेले बच्चू कडू यांच्यावर आज जोरदार प्रहार केला. घरी बोलावून त्याला मंत्री बनवले ही माझीच चूक ठरली. लोभापायी तो गेला, पण कार्यकर्ते शिवसेनेसोबत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी परभणीमधील प्रहार जनशक्ती संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंचा समाचार घेतला. शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार नागेश पाटील-आष्टीकर जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे यावेळी उपस्थित होते.

आम्हाला विकून बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केला!

बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या आमदारकीच्या लोभाने शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. फसवलो गेल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आज ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघड केली. आम्हाला विकून बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केला, आम्ही स्वाभिमानी असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आपल्यातून गेलेला माणूस जुना शिवसैनिक होता. त्याला मोठं करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, पण काही लोक सत्तेच्या आणि पदाच्या मोहात अडकले. लोभापायी जे गेलेत त्यांना जाऊ द्यात.

प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील उपस्थित होते.

Comments are closed.