विद्यार्थ्यांना रेनकोट पावसाळ्याच्या मध्यावर मिळणार आहेत का? पावसाळ्याच्या तोंडावर खरेदीचा प्रस्ताव, स्थायी समितीत विरोधक आक्रमक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाळा अगदी तोंडावर आला असताना पालिकेने आता ‘जेम’ पोर्टलवरून विद्यार्थ्यांच्या रेनकोट खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र या प्रकियेनुसार किमान 45 दिवसांनंतर पुरवठा होणार आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या मध्यावर रेनकोट मिळणार का? विद्यार्थ्यांनी पावसाळ्याचे पहिले दोन महिने रेनकोटशिवाय शाळेत जायचे का? असा सवाल करीत आज विरोधकांनी स्थायी समितीत अनेक प्रश्न उपस्थित केले.

शिवसेनेचे यशोधर फणसे यांनी या प्रस्तावावरून प्रशासनाला धारेवर धरले. शिवाय या विषयावरून राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या रेनकोटचा दर्जा म्हणजे एक दिवस वापरा आणि फेकून द्या असा असतो. त्यामुळे रेनकोट न देता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावे, अशी सूचना ‘मनसे’चे यशवंत किल्लेदार यांनी केली.  रेनकोट पुरवठय़ासाठी एकाच निविदाकाराकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’ आहे का, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी केला. दोन वर्षांसाठी एकच रेनकोट दिला जाणार असताना दोन वर्षांत मुलांची उंची वाढते, त्यामुळे रेनकोट विद्यार्थ्यांना कसा उपयुक्त ठरणार, असा सवाल काँग्रेस नगरसेविका अंजता यादव यांनी उपस्थित केला.

सत्ताधाऱ्यांचा मात्र पाठिंबा

जेम पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीचे समर्थन करत या पद्धतीमुळे 25 ते 30 टक्के खर्चात बचत होत असून गुणवत्तापूर्ण साहित्य मिळणार आहे, असे सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले. या वेळी प्रत्येक रेनकोटसाठी 218 रुपये खर्च करण्यात येत असून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना रेनकोट वितरित करण्यात येतील, असे सांगत प्रस्ताव मंजूर झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी जाहीर केले.

पालिका म्हणते 2 कोटी 30 लाखांची बचत होणार

रेनकोट खरेदीसाठी जेम पोर्टलवर सात निविदाकारांचा प्रतिसाद मिळाला, पण सहा निविदाकारांची कागदपत्रे योग्य नसल्याने जेम पोर्टलवर 48 तासांत रद्द करत पुढील प्रक्रिया केली जाते. केंद्र सरकारने 2016 मध्ये जेम पोर्टल अमलात आणले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या रेनकोट खरेदीत 2 कोटी 30 लाखांची बचत झाल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.

Comments are closed.