शिवसेनेचे सर्व खासदार एकजूट आणि एकनिष्ठ; ‘मातोश्री’वर संसदीय पक्षाची बैठक, उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
शिवसेनेचे सर्व खासदार एकजूट आहेत आणि निष्ठेने पक्षाच्या पाठीशी ठाम उभे आहेत. ‘मातोश्री’ निवासस्थानी आज झालेल्या बैठकीला प्रत्यक्ष तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकसभेतील पक्षाच्या सर्व खासदारांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले आणि खासदारांशी संवाद साधला. बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
शिवसेना संसदीय पक्षाची नियमित बैठक होत असते. त्यानुसार आज मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक झाली. बैठकीला शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील-आष्टीकर, संजय देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते-सचिव विनायक राऊत, सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर हे बैठकीला उपस्थित होते.
आम्ही पक्षाशी एकनिष्ठ- आष्टीकर
मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही, असे नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. दोन वर्षांपासून ऑपरेशन टायगरच्या वल्गना होत आहेत. कसले ऑपरेशन टायगर?, असा सवाल करताना आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या पूर्णतः खोटय़ा आणि निराधार आहेत. कुठलाही खासदार कुणाच्याही संपर्कात नाही, असे आष्टीकर म्हणाले. पक्षप्रमुखांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो. विधान परिषद निवडणूक असल्याने मी बैठकीसाठी मुंबईला येऊ शकणार नाही, असे अगोदरच कळवले होते, असेही आष्टीकर यांनी स्पष्ट केले.
अफवांचे बाजार बंद करा
बैठकीनंतर संजय राऊत माध्यमांशी बोलले. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा संजय राऊत यांनी फेटाळून लावली. ‘कसलं ऑपरेशन टायगर? कुठल्या ऑपरेशन टायगरबद्दल तुम्ही बोलताय? आम्ही सगळे टायगरच आहोत. आता आम्हीच ‘ऑपरेशन लांडगा’ करणार आहोत. तेव्हा या अफवांचा बाजार आता बंद करा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
हे खासदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी
जे खासदार बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नव्हते त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अधिक माहिती दिली. ‘ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिथून ओमराजे यांनी बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत. शिर्डीच्या दवाखान्यातून ते बैठकीत सहभागी झाले. नागेश आष्टीकर यांचे पुत्र हिंगोली-परभणीतून विधान परिषद निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्यांनी तिथूनच सहभाग घेतला. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरात मंगलकार्य आहे. मुलीच्या लग्नासंदर्भात बैठक आहे. त्यांनीही घरूनच उपस्थिती लावली’, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
पुढच्या महिन्यातही होणार बैठक
‘संसदीय पक्षाची ही नियमित बैठक होती. पुढील महिन्यातदेखील अशीच बैठक होईल. आज जे खासदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, ते दोन-तीन दिवसांत उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असे संजय राऊत म्हणाले.
संजय जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा
परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली. तेसुद्धा येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Comments are closed.