कश्मीरच्या मातीचा आणि संस्कारांचा सुगंध दरवळला, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘लल देद : काश्मीरची आई’ पुस्तकाचे प्रकाशन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘लल देद : काश्मीरची आई’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघात आज झाले. लल देदच्या माध्यमातून कश्मीरच्या मातीचा आणि संस्काराचा सुगंध घेऊन आलात, अशा शब्दांत त्यांनी पुस्तकाच्या लेखिका डॉ. वैदेही तामण यांचे कौतुक केले.

लल देद या चौदाव्या शतकातील कश्मीरमधील संत होत्या. त्यांनी तेथील हिंदू, मुस्लिम व अन्य सर्व धर्मांच्या लोकांना आपल्या ओव्यांमधून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. लल देद या पुस्तकाचा विषय वाचायला अवघड आहे तसा पचायलाही अवघड आहे. पुस्तकात बऱ्याच ठिकाणी कर्मकांडावर प्रहार करणारे प्रबोधनकार दिसतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वैदेही तामण यांनी कश्मीरमध्ये जाऊन अक्रोड फोडण्याचा अडकित्ता नाही; तर धर्माबद्दल, अध्यात्माबद्दल असणारे भ्रम किंवा गैरसमजुती फोडण्याचा अडकित्ता आणला, असे ते पुढे म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

राम मंदिरात चोरी होते, त्यात पावित्र्य आहे का?

कुणाच्या घरात चोरी केली, कुणाचा पक्ष चोरला तर ते पाप आहे; पण मंदिरात चोरी केली तर पाप कसे? ते पुण्यच असायला हवे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चोरांचा बचाव करणाऱ्या भाजप सरकारला चिमटा काढला. शिवसेनेने रामरक्षा आंदोलन केले. त्यावरून माझ्यावर टीका झाली. रामरक्षा पाठ आहे का असे विचारले गेले. एखादी गोष्ट येण्यासाठी ती पाठ असणे गरजेचे नाही. त्याचा अर्थ समजणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

युत्या, आघाडय़ांनी काहीही होणार नाही

तुझ्यात आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला मरण नाही, या बाळासाहेबांच्या वाक्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्मविश्वासासारखे दुसरे काहीच नाही. सोबत राहणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपले मन. मन भरकटले तर कुणाच्याही बरोबर युत्या किंवा आघाडय़ा करा, काहीही होणार नाही. दाखवायचे व खायचे दात वेगळेच असतात, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना लगावला.

तीर्थाटनावरून आल्यावर दुसरेच ‘तीर्थ’ प्राशन करणारे शिवसेनेचे हिंदुत्व नाही

आपण सगळे राक्षस म्हणून जगतोय की काय? माणुसकी विसरून चाललो आहोत, धर्मावरून मारामाऱ्या करायला लागलो आहोत. या पुस्तकात प्रबोधनकार आणि बाळासाहेब दिसतात; कारण शिवसेना कट्टर, कडवट आहेच, पण शिवसेनेचे हिंदुत्व देशप्रेमाशी निगडित आहे. तीर्थाटनाला जाऊन आले आणि ‘तीर्थ’ प्राशन करायला बसले असले शिवसेनेचे हिंदुत्व नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या पुन्हा एकदा स्पष्ट केली.

Comments are closed.