ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोन भिरभिरत आला, सुरक्षारक्षक धास्तावले, व्हिडीओ व्हायरल होता
मातोश्री ड्रोन: ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एक अज्ञात ड्रोन फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. हा ड्रोन या परिसरात कोणी पाठवला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, मातोश्रीसमोरील या ड्रोनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मातोश्रीवर (Matoshree) ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर हा ड्रोन (Drone) घिरट्या घालत असताना दिसून आला. हा ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षारक्षकांच्या दृष्टीस पडला. त्यावेळी त्यांनी हवेत उडणाऱ्या या ड्रोनचा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर मातोश्रीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Mumbai News)
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मातोश्रीवर नजर ठेवली जात आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे गटाकडून भाजप ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीची टेहळणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री राहिलेल्या आणि एका पक्षाचा प्रमुख असलेल्या नेत्याच्या घराबाहेर अशाप्रकारे टेहळणी केली जात असेल, तर हा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या लिंबूटिंबू लोकांना सुरक्षा देऊन ठेवली आहे. परंतु, मातोश्रीबाहेरील सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. भाजपला लोकांच्या किचनमध्ये डोकावण्याचा छंद आहे. मतचोरी उघड झाल्यानंतर भाजप धास्तावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटायला कोण येते, यावर नजर ठेवली जात आहे. असं काही घडलं नसेल तर हा ड्रोन कोणी सोडला होता, मातोश्रीच्या सुरक्षेत हयगय कशी होऊ शकते, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
Mumbai Police: मातोश्रीबाहेर ड्रोनबाबत मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण
मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोन फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानिमित्ताने मातोश्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर बीकेसी पोलिसांकडून यांसदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा ड्रोन अज्ञात नसून एमएमआरडीने पाठवला होता. 8 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान हे सर्वेक्षण सुरु होते. पॉडटॅक्सी प्रकल्पासाठी हे सर्वेक्षण सुरु होते. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आल्याचे बीकेसी पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले….
आणखी वाचा
Comments are closed.