मुख्यमंत्री असताना काही केलं नाही आता प्रायश्चित घ्या, दसरा मेळाव्याचे पैसे पूरग्रस्तांना द्या:


Dasara Melava Rain: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मदतीवरुन महायुती सरकारवर सातत्याने टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपने (BJP) आता कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेला शिवसेनेचा मुंबईतील दसरा मेळावा (Dasara Melava) रद्द करुन ते पैसे ठाकरे गटाने पूरग्रस्तांना द्यावेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांच सगळं उध्वस्त झालं आहे. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव,आता वेळ आहे कृती करायची. मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल, असे ट्विट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे, आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थयथयाट अन् कांगावा… त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की, असेही केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Dasara Melava 2025: दसरा मेळाव्यासाठी मुंबईत ठाकरे गटाच्या तयारीला वेग

दसरा मेळाव्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईत दोन्ही शिवसेनेच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यामध्ये दसरा मेळाव्याच्या आयोजना संदर्भात निर्णय घेतले जात आहेत यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा पावसाचा सावट असले आणि शिवाजी पार्कवर चिखलाचा साम्राज्य जरी असलं तरी शिवतीर्थावरच मेळावा घ्यायचाच, असा चंग ठाकरे गटाने बांधला आहे.मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना आणि पुढे दोन-तीन दिवस अशाच प्रकारे पावसाचा अंदाज वर्तवला जात असताना सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस असो किंवा शिवाजी पार्क मैदानावर चिखल ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असून त्यासाठीची तयारी आज दुपारपासून सुरू होईल. या सगळ्या संदर्भात मागील आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली शिवाय काल सेना भवन येथे शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बैठक सुद्धा पार पडली. कुठल्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला असल्याची माहिती आहे.

https://www.youtube.com/watch?v=t_f2hvjeoye

आणखी वाचा

केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी

आणखी वाचा

Comments are closed.