उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा; राम मंदिर लुटीविरोधात शिवसेनेची संघर्षयात्रा, पुढील आठवड्यात नागपूरपासून सुरुवात
तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीमुळे देशात संतापाची लाट आहे. प्रभू रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या भाजपच्या राजवटीत पडलेल्या या दरोडय़ाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. मुंबईत पहिली ठिणगी पडल्यानंतर या आंदोलनाचा वणवा आता राज्यभर पेटणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः त्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार असून जिह्याजिह्यांत जाऊन आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
शिवसेनेच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक मंगळवारी ‘मातोश्री’ येथे झाली. उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला. राज्यातील व देशातील राजकीय परिस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली. राम मंदिरातील चोरीच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. राम मंदिर लुटीविरोधात उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे सर्व आमदारांनी स्वागत आणि काैतुक केले. याच बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरली. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
‘राम मंदिर लुटीच्या विरोधात प्रत्येक जिह्यात होणाऱ्या आंदोलनाला उपस्थित राहण्याची विनंती आमदारांनी उद्धव ठाकरे यांना मंगळवारच्या बैठकीत केली. उद्धव ठाकरे यांनी ती विनंती मान्य केली आहे. त्यानुसार ते महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. लवकरच त्यांच्या दौऱयाचा कार्यक्रम ठरेल,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.
n ‘देणगी चोरीविरोधी आंदोलनाची सुरुवात मुंबईत झाली. आता दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीतून नागपूरपासून सुरू होईल. पुढच्या आठवडय़ात उद्धव ठाकरे नागपूरला जातील. तत्पूर्वी, आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी मी आणि अंबादास दानवे नागपूरला जाणार आहोत. नागपूरमध्ये विराट आंदोलन केले जाईल. त्यानंतर पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर असे करत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालू,’ असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठेसाठी सुरू झालेली ही चळवळ, संघर्षयात्रा आहे. ही थांबणार नाही. राम मंदिर कसं लुटलं, कसा भावनांशी खेळ झाला, कशी श्रद्धेची विक्री झाली, हे शिवसेना गावागावात आणि घराघरात पोहोचवणार आहे.
Comments are closed.