उमर खालिदला 'टॉप नोच' झटका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या धार्मिक दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालीद याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या दंगल प्रकरणात, काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाचा फेरविचार केला जावा, अशी याचिका त्याने सादर केली होती. ती याचिका फेटाळली गेली आहे.
आम्ही याचिकाकर्त्याची पुनरावलोकन याचिका अभ्यासली आहे. या याचिकेसह जोडण्यात आलेली कागदपत्रेही आम्ही तपासली आहेत. मात्र, याचिकेत कोणताही नवा मुद्दा उपस्थित केला गेलेला नाही. तसेच कोणताही भक्कम मुद्दाही दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिलेला याचिका फेटाळण्याचा निर्णय योग्य आहे. त्या निर्णयातील कोणतीही त्रुटी याचिकेत स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुनरावलोकन याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
प्रदीर्घ काळ प्रतीक्षा हे नाही कारण
उमर खालीद याच्या युएपीए कायद्यानुसार आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे नोंद आहेत. अशा स्थितीत केवळ त्याला प्रदीर्घ काळ कोठडीत रहावे लागले आहे, हे कारण जामीन मिळविण्यासाठी, किंवा जामीन नाकारण्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी पुरेसे ठरु शकत नाही, अशी कारणमीमांसा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयपत्रात केल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.