मोहम्मद सिराजचे नेतृत्व भारीच! रणजी ट्रॉफी 2026-27 हंगामाचा पहिला विजय हैदराबादने नोंदवला, तनय त्यागराजनच्या 9 विकेट्स

भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील मानाची एक स्पर्धा, रणजी ट्रॉफी. या स्पर्धेचा २०२६-२७ हंगाम सुरू झाला आहे. या हंगामाचा पहिला विजय मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखालील हैदराबादने नोंदवला आहे. हैद्राबादने त्रिपुराला एक डाव आणि ४० धावांनी पराभूत केले. या सामन्यात तनय त्यागराजनने तब्बल ९ विकेट्स घेतल्या.

हैदराबादच्या जिमखाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्रिपुराने नाणेफेक जिंकला होता. त्यांचा कर्णधार मणीशंकर मुरासिंग याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्रिपुराने पहिल्या डावात बिक्रमकुमार दासच्या अर्धशतकी आणि हृतिराज रॉयच्या ३३ धावांच्या जोरावर १३४ धावसंख्या उभारली होती. यावरून हैदराबादची गोलंदाजी किती प्रभावी होती, हे कळते. या डावात सिराजने एकही विकेट घेतली नाही, मात्र त्याने कमी धावा खर्च केल्या. त्याने ९ षटकांत २५ धावा दिल्या. यामध्ये त्याने दोन षटके निर्धाव टाकली. तसेच हैदराबादकडून अनिकेत रेड्डीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तनयने ३ आणि रुतिक यादवने एक विकेट घेतली.

हैदराबादच्या पहिल्या डावात सलामीवीर तनय अग्रवालने ५४ धावा आणि अभिरथ रेड्डीने ३२ धावा करून संघाला चांगली सुरूवात दिली. मधली फळी अधिक काळ टिकली नाही. रुतिक यादवने ६१ धावा, राहुल रादेश आणि चमा मिलिंद यांनी प्रत्येकी ४०-४० धावा केल्या. त्यामुळे हैदराबादने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत २९४ धावासंख्या केली. त्यामुळे हैदराबादने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. त्रिपुराकडून संदिप सरकारने ८ विकेट्स घेतल्या.

त्रिपुराचा दुसरा डावही अवघ्या १२० धावसंख्येवर संपष्टात आला. त्यांचे ६ खेळाडू दुहेरी धावसंख्येचा आकडाही गाठू शकले नाही. यामध्ये हैदराबादकडून तनयने प्रभावी कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत या सामन्यात एकूण ९ विकेट्स घेतल्या.

या विजयामुळे हैदराबाद सात गुणांसह ‘गट ब’मध्ये अव्वल स्थानावर पोहोचले. (Under Mohammed Siraj Captaincy Hyderabad became first team to register a win in Ranji Trophy 2026-27 defeating Tripura)

Comments are closed.