पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व मतदान झाले

आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत, तामिळनाडूतही प्रचंड प्रमाण

उत्सव लोकशाहीचा, उत्साह मतदारांचा(मतदानाची टक्केवारी गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची)

  • पश्चिम बंगाल (प्रथम टप्पा 152 मतदारसंघ) मतदान 91.40 टक्के
  • तामिळनाडू (सर्व 234 मतदारसंघ) मतदान 84.35 टक्के

वृत्तसंस्था/कोलकाता, चेन्नई

पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या प्रथम टप्प्यात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढणारे अभूतपूर्व मतदान झाले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी 91.40 टक्के इतकी प्रचंड आहे. शुक्रवारी सकाळी मतदान टक्केवारीचे नेमके प्रमाण समोर येईल. मात्र, मतदारांच्या या अद्भूत उत्साहाला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. या राज्यात प्रथम टप्प्यात चार जिल्ह्यांमध्ये 10 स्थानी हिंसाचाराच्या घटना घडल्या.

तामिळनाडूमध्येही विक्रमी मतदान नोंदविले गेले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या राज्याच्या सर्व मतदारसंघांमध्ये 84.35 टक्के मतदान झाले. या राज्यातील अंतिम टक्केवारी शुक्रवारीच सकाळी समजण्याची शक्यता आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ‘सखोल मतदारसूची पुनर्परीक्षण’ (एसआयआर) हाती घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये जवळपास 91 लाख तर तामिळनाडूत 70 लाख अवैध मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मतदानात एवढी प्रचंड वाढ झाल्याचे तज्ञांचे मत आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रथम टप्पा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकंदर 294 जागा असून प्रथम टप्प्यात त्यांच्यापैकी 152 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. द्वितीय टप्प्याचे मतदान येत्या बुधवारी, अर्थात 29 एप्रिलला, उर्वरित 142 मतदारसंघांमध्ये होणार आहे. 29 एप्रिललाच संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष समोर येतील. ही दोन राज्ये आणि 9 एप्रिलला मतदान झालेली आसाम आणि केरळ ही दोन राज्ये, तसेच पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश येथील मतगणना 4 मे (सोमवार) या दिवशी होणार आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

या विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. विशेषत: पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांचे  जवळपास 3 लाख सैनिक नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्रात यावेळी राज्य पोलिसांऐवजी केंद्रीय सुरक्षा दलांचे सैनिक नियुक्त करण्यात आले होते. तसेच, मतदारांना मतदान करण्यापासून कोणीही रोखू नये, त्यांना धाकदपटशा दाखविला जाऊ नये आणि कोणत्याही पद्धतीने मतदानात बाधा येऊ नये, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केली होती. त्यामुळे तुलनेते मतदान शांततेत पार पडल्याचे दिसून आले. पश्चिम बंगालमध्ये सकाळी सहा वाजल्यापासूनच (मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी 1 तास) मतदारांच्या रांगा पहावयास मिळत होत्या. मतदारांचा हा उत्साह आणि जोश अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टिकून होता. महिलांचे मतदान तर पुरुषांपेक्षा अधिक झाल्याचे दिसले.

वाढीव मतदान कोणाला लाभदायक…

पश्चिम बंगालमध्ये याच 152 मतदारसंघांमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीत साधारणत: 82 टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी जवळपास 8 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे वाढीव मतदान कोणाला लाभदायक ठरणार, या चर्चेला आता प्रारंभ झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी आपल्या यशाचे भाकित केले आहे. भारतीय जनता पक्षाकडून मतदारांचे विशेष आभार मानण्यात आले.

Comments are closed.