UPI व्यवहार मोफत राहतील.
युपीआय व्यवहारांसंबंधी केंद्र सरकारने एक मोठे स्पष्टीकरण केले आहे. युपीआयच्या माध्यमातून व्यक्ती ते व्यक्ती (पर्सन टू पर्सन) पद्धतीने केलेले पैशाचे हस्तांतरण विनामूल्य किंवा फ्री राहणार आहे. केवळ व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी केलेल्या व्यवहारांवर शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युपीआयच्या उपयोगकर्त्यांवर (युजर्स) कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व पर्सन टू पर्सन व्यवहार विनामूल्यच असतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थविभागाने एका वक्तव्याद्वारे केली आहे. त्यामुळे असंख्य नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केवळ व्यापारासाठी केलेल्या व्यवहारांवर एकंदर रकमेवर 0.25 टक्के ते 0.4 टक्के शुल्क आकारण्याची मुभा बँकांना देण्यात आली आहे. हे शुल्क केवळ व्यापारी व्यवहारांसाठीच असेल. या शुल्क आकारणीचा व्यक्तीगत पैसा हस्तांतरणाशी संबंध नाही. व्यापारी व्यवहारांच्या संदर्भातही 2 हजार रुपयांपर्यंतच्या हस्तांतरणावर शुल्क द्यावे लागणार नाही. व्यापारी व्यवहार या रकमेपेक्षा अधिकचा असेल, तरच शुल्क आकारण्याचा अधिकार देशातील बँकांना देण्यात आला आहे.
देशात सध्या बरेच व्यवहार युपीआयच्या माध्यमातून होत आहेत. मोबाईल किंवा ऑनलाईन माध्यमातून हे व्यवहार होत असल्याने बऱ्याच नागरिकांकडून अशा व्यवहारांना प्राधान्य दिले जाते. सरकारकडूनही गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले होते.
Comments are closed.