फिफा वर्ल्ड कपमध्ये 6 मिनिटांच्या हायड्रेशन ब्रेकवरून गोंधळ! खेळाची नाही केवळ चिंता पैशांची? प्रमुखांनी दिले स्पष्टीकरण

फिफा विश्वचषक २०२६ ची आवृत्ती अनेक कारणांमुळे खास ठरली आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ४८ संघ, १०४ सामने आणि तीन देशांनी (अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको) मिळून स्पर्धा आयोजन केले. असे असले तरी एका बाबीमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे, हायड्रेशन ब्रेक. सामन्यावेळी हवामान कसेही असो आणि स्टेडियम इनडोअर किंवा आउटडोअर असो, पहिल्यांदाच प्रत्येक फिफा विश्वचषक सामन्यात दोन हायड्रेशन ब्रेक अनिवार्य करण्यात आले आहे. तो प्रत्येक ब्रेक तीन मिनिटांचा असेल. यामधील पहिला ब्रेक पहिल्या हाफच्या २२ व्या मिनिटाला आणि दुसरा ब्रेक दुसऱ्या हाफच्या ६७ व्या मिनिटाला असेल. हीच सहा मिनिटे मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे.

फिफाची सर्वात मोठी चिंता आपल्या खेळाडूंचे आरोग्य आहे. उत्तर अमेरिकेमध्ये अनेक शहरामध्ये तीव्र उष्णता असते, ज्यामुळे ३९ दिवसांत आठ सामने खेळणाऱ्या संघांसमोर एक मोठे आव्हान आहे. अशा वातावरणात उष्माघाताचा अधिक धोका असल्याने ते जीवालाही धोकादायक आहे. याबद्दल फिफाचे प्रमुख जियानी इन्फॅंटिनो म्हणाले, “सर्व संघांना समान परिस्थिती मिळावी अशी आमची इच्छा आहे. अधिक उष्णता असल्यामुळे एका प्रशिक्षकाला सामन्यात बदल करण्याची संधी मिळते, तर दुसऱ्याला ती मिळत नाही, हे मानणे कठीण आहे. यासाठीच हा ब्रेक ठेवण्यात आला आहे.”

आधीच्या स्पर्धांमध्ये हायड्रेशन ब्रेक केवळ खूप उष्ण परिस्थितीत घेतले जात होते, आता मात्र ते प्रत्येक सामन्यात लागू करण्यात आले आहे. २०१४ पासून हे ब्रेक लागू करण्यात आले मात्र, आधी ते केवळ परिस्थितीनुसार घेतले जात होते, आता मात्र ते प्रत्येक सामन्यात दोन्ही हाफमध्ये घेण्याची ताकीद आहे.

या ब्रेकला खुद्द अमेरिकेच्या प्रशिक्षकानेच नाराजी दर्शवली आहे. मॉरिसिओ पोचेटिनो म्हणाले, “खरं सांगायचे तर मला हे ब्रेक्स आवडत नाही. त्यामुळे खेळाची लय बिघडू शकते. अटलांटा स्टेडियममधील तापमान २१-२३ अंश सेल्सिअस असताना तेथे अशा ब्रेक्सची आवश्यकता नाही. मला थोडा त्रास झाला, मात्र हा एक नवा नियम असून त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल.”

या ब्रेक्सबद्दल इंग्लंडचे प्रशिक्षक थॉसम टुचेलही म्हणाले, “ब्रेक्समुळे खेळाची ओळख बदलते. तसेच आधी जे ब्रेक्स होते ते फार कमी वेळाचे होते. ब्रेक्सशिवाय, खेळ हा खेळाडू आणि संघांमधील एका दीर्घ लढाईसारखा असतो, हेच या सुंदर खेळाचा अर्थ आहे.”

खेळाची नाही केवळ चिंता पैशांची?
अमेरिकेत सामने प्रसारण करणाऱ्या फॉक्स स्पोर्ट्ससाठी हे ब्रेक्स एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनले आहे, कारण प्रत्येक ब्रेकदरम्यान ते जाहिराती दाखवते. काही रिपोर्ट्सनुसार, ३० सेकंदांच्या जाहिरातीच्या स्लॉटची किंमत २,००,००० ते ७,००,००० डॉलर्स असते. ६ मिनिटांच्या या ब्रेकमुळे प्रत्येक सामन्यामागे २५ लाख ते ९० लाख डॉलर्सची कमाई होते. १०४ सामन्यामध्ये ही रक्कम ५०० दशलक्ष ते ६०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

फॉक्सने या संपूर्ण स्पर्धेच्या प्रसारण हक्कांसाठी ४००-५०० दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. याचा अर्थ केवळ हायड्रेशन ब्रेक्समधूनच त्यांचा हा खर्च वसूल होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.