US Midterm Elections 2026 – विजयाचा ‘षटकार’ ठोकणाऱ्या प्रमिला जयपाल कोण आहेत?
अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार मुसंडी मारली. सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने बहुमत मिळवले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या प्रमिला जयपाल यांनी विजय मिळवला आणि सलग सहाव्यांदा प्रतिनिधी सभागृहात प्रवेश केला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार नीरव सेठ यांचा पराभव केला. प्रमिला जयपाल यांना 88 टक्के, तर नीरव सेठ यांना 12 टक्के मते मिळाली.
कोण आहेत प्रमिला जयपाल?
प्रमिला जयपाल या अमेरिकी प्रतिनिधी सभेवर निवडून गेलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई वंशाच्या महिला आहेत. त्यांचा जन्म हिंदुस्थानातील चेन्नई येथे झाला. त्यांचे बालपण हिंदुस्थान, इंडोनेशिया आणि सिंगापूर या देशांमध्ये गेले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्या उच्च शिक्षणासाठी एकट्याच अमेरिकेत दाखल झाल्या. त्यांनी जॉर्जटाउन विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली. अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांत काम केले. पुढे त्यांनी स्थलांतरितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या वन अमेरिका या संस्थेची स्थापना केली आणि कार्यकारी संचालकही झाल्या.
आई-वडील आजही हिंदुस्थानात वास्तव्यास
प्रमिला जयपाल या काँग्रेसनल प्रोग्रेसिव्ह कॉकसच्या माजी अध्यक्षा असून सध्या त्यांच्याकडे या पदाचे मानद अध्यक्षपद आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या न्यायिक समितीच्या स्थलांतरविषयक उपसमितीमध्ये त्या वरिष्ठ डेमोक्रॅटिक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच परराष्ट्र व्यवहार समितीच्या दक्षिण आणि मध्य आशिया उपसमिती व अर्थसंकल्प समितीवरही त्यांची नियुक्ती आहे. 2023मध्ये हिंदुस्थानविषयी बोलताना त्यांनी हिंदुस्थानला आपली जन्मभूमी असे संबोधले होते. त्यांचे आई-वडील आजही हिंदुस्थानात वास्तव्यास असून, अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्यापूर्वी जवळपास तीन दशके त्या हिंदुस्थानी नागरिक होत्या.
ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतरविषयक धोरणांना विरोध
प्रमिला जयपाल यांनी स्वतःच्या स्थलांतरित म्हणून आलेल्या अनुभवांचा अनेकदा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतरविषयक धोरणांवर टीका केली आहे. कायदेशीर मार्गाने अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांसाठी नियम अधिक कठोर करण्याच्या निर्णयांना त्यांनी विरोध दर्शवला आहे. विशेषतः एच-1बी व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ करून ते एक लाख डॉलरपर्यंत नेण्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला होता. डिसेंबर 2025 मध्ये संसदीय सुनावणीदरम्यान त्यांनी प्रशासन कायदेशीर स्थलांतराचे मार्ग बंद करत असल्याचा आरोप केला होता. अशा प्रकारची धोरणे भेदभावपूर्ण असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
हिंदुस्थानी उत्पादनांवरील आयात शुल्कालाही विरोध
अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांविरोधात वाढणाऱ्या द्वेषाच्या घटनांबाबतही प्रमिला जयपाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये अमेरिकी काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या दक्षिण आणि मध्य आशिया उपसमितीच्या सुनावणीदरम्यान त्यांनी हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर लादलेल्या शुल्काचा मुद्दा उपस्थित केला होता. या आयात शुल्कामुळे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून, अमेरिकी व्यापारी आणि ग्राहकांनाही त्याचा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
Comments are closed.