अमेरिका ब्लेम गेम खेळत आहे, आता चर्चेचा कोणताही विचार नाही; इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणने अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची नवीन चर्चा करण्याची योजना नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले आहे. टीव्ही९ भारतवर्षच्या वृत्तानुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. दोन्ही देशांमधील संबंधांबाबत अनिश्चितता कायम असतानाच इराणने चर्चेची कोणतीही तयारी सुरू नसल्याचे सांगत अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

अमेरिका चर्चेबाबत अजिबात गंभीर नसून ते सातत्याने सीजफायरचे उल्लंघन करत आहेत, असा आरोप इराणने केला आहे. बघाई यांनी अमेरिकेवर ब्लेम गेम खेळत असल्याचा करत म्हटले आहे की, अमेरिकेचे बोलणे आणि कृती यात मोठी तफावत आहे. ज्यामुळे त्यांच्यावर असलेला विश्वास पूर्णपणे तुटला आहे. लेबनानशी संबंधित कराराचे पालन न करणे आणि आपल्या जबाबदारीतून मागे हटणे, यामुळे परिस्थिती अधिक बिघडली आहे.

बघाई म्हणाले आहेत की, अमेरिकेने इराणवर समुद्री नाकेबंदी लादण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या सैन्याने एका इराणी व्यापारी जहाजावर हल्ला केला आहे. ही कृती आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि सीजफायरचे थेट उल्लंघन आहे. यापूर्वीही चर्चेच्या काळात अमेरिकेने हल्ले केल्याची आठवण इराणने करून दिली आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने या सर्व बाबी अमेरिकेच्या कानावर घातल्या होत्या, तरीही त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे इराणचे म्हणणे आहे.

इस्माईल बघाई म्हणाले, इराणने इस्लामाबादमध्ये १० मुद्दे मांडले होते. ज्यावर चर्चा झाली होती. परंतु अमेरिकेच्या कृतींमुळे विश्वास आणखी कमी झाला आहे. इराणचा दावा आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्वी सुरक्षित होती, परंतु अमेरिका आणि इस्रायलच्या कारवाईनंतर परिस्थिती बिघडली.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शेवटी असा इशारा दिला की, जर अमेरिका किंवा इस्रायलने पुन्हा हल्ला केला तर इराणचे सैन्य त्याला जशास तसे उत्तर देईल. जोपर्यंत विश्वास पुन्हा प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत चर्चेची कोणतीही शक्यता नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.