शांतता चर्चा सुरू असतानाच होर्मुझमध्ये धुमश्चक्री, अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला
शांतता करारासाठी वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिका व इराणमध्ये आज धुमश्चक्री उडाली. होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने इराणी बोटींना लक्ष्य केले. तसेच क्षेपणास्त्र तळावरही हल्ला केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेचे एमक्यू 9 हे ड्रोन पाडले, तर इराणच्या हवाई हद्दीत घुसू पाहणाऱया आरक्यू 4 ड्रोन आणि एफ-35 जेट विमानावर गोळीबार करत त्यांना माघार घ्यायला भाग पाडले. या चकमकीमुळे टेन्शन वाढले आहे.
तब्बल 40 दिवसांच्या युद्धानंतर अमेरिका व इराणमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. तेव्हापासून जवळपास महिनाभर दोन्ही देशांत कायमस्वरूपी शांतता करारावर चर्चा सुरू आहे, मात्र दोन्हीकडून काही मुद्दय़ांवर ठाम भूमिका घेतली जात असल्याने करार प्रत्यक्षात आलेला नाही. ट्रम्प हे होर्मुझ खुले करण्यावर भर देत आहेत, तर होर्मुझवर आमचाच ताबा राहील असा इराणचा आग्रह आहे. दोन्ही बाजूंकडून नवनवे प्रस्ताव पाठवले जात असतानाच आज अचानक अमेरिकेने होर्मुझजवळ इराणी बोटींवर हल्ला केला. तसेच इराणच्या लष्करी तळालाही लक्ष्य केले. त्यास इराणने लगेचच प्रत्युत्तर दिले. अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर दिले जाईल, असा इशारा आयआरजीसीने दिला आहे.
खामेनींनी ठणकावले
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिका व इस्रायलवर शाब्दिक हल्ला चढवला. ‘अमेरिकेचे आखातातील वर्चस्व आता संपुष्टात आले आहे. काळाची पावले आता उलटी पडणार नाहीत. आखाती देश यापुढे अमेरिकेच्या लष्करी तळांसाठी ढाल बनून काम करणार नाहीत. अमेरिकेचे तळ येथे सुरक्षित नसतील. सौदी, यूएई किंवा कतारने अमेरिकेला इराणविरोधात आपल्या भूमीचा वापर करू दिल्यास इराण त्यांना कसलीही दयामाया दाखवणार नाही, असा इशारा खामेनी यांनी दिला.
Comments are closed.