हा तलाव नाही… हा आहे जव्हारचा वडोली-चालतवड रस्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाशी जोडणाऱ्या वडोली चालतवड रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी तब्बल तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. रस्ता की तलाव हेच कळत नसल्याने या मार्गावर अपघात वाढले आहेत. हा महत्त्वाचा आंतरराज्य जोडमार्ग असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारक तीन महिन्यांत शेकडो प्रवासी जायबंदी वडोली-चालतवड मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळल्याने मान, कंबर, मनका दुखावणे तसेच वाहनांचे चेंबर फुटणे, मडगार्ड तुटणे, चाकांचे व सस्पेन्शनचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वारांनाही या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून खड्डयांमुळे अपघात होऊन तीन महिन्यांत शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत.

फक्त व्हीआयपी दौऱ्यासाठी रस्ता दुरुस्त
१५ ऑगस्ट रोजी दाभोसा येथील पर्यटनस्थळावरील काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले. व्हीआयपी दौरा असल्याने त्यावेळी जव्हार ते दाभोसा मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बुजविले. मात्र पुढे दाभोसा ते खंरंबा आणि चालतवडपर्यंतचे खड्डे मात्र बुजवले नाहीत. खंबाळा ते जव्हार असा प्रवास कसरतीचा झाला आहे. चालतवड येथील गाडगे महाराज आश्रमशाळेजवळ चार फुटांचे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचून खड्यांचे तलाव झाले आहेत.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
दाभोसा पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविले जातात. मात्र महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेलीला जोडणाऱ्या रस्त्याकडे लक्ष दिले जात नाही, असा सवाल नागरिकांचा आहे. या मार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आहे.
छाया : चित्रांगण घोलप

Comments are closed.