वैभव खेडेकरांच्या हालचालींचा सुगावा लागताच राज ठाकरेंनी आदेशच काढला; मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

Vaibhav Khedekar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपमध्ये किंवा शिवसेना (शिंदे गटात) जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर मनसेने अधिकृत निर्णय घेत, खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांची देखील मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून 2006 मध्ये मनसेची स्थापना केली, तेव्हापासून वैभव खेडेकर त्यांच्या सोबत होते. कोकणात मनसेच्या संघटनात्मक उभारणीत खेडेकरांचा मोठा वाटा राहिला आहे. दापोली आणि खेड परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क असून, तरुणांमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे.

भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ

गेल्या काही दिवसांत वैभव खेडेकर यांना भाजपकडून खुले आमंत्रण मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आलं. दापोलीत पार पडलेल्या महायुतीच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर उपस्थित होते. महायुतीतील नेत्यांनी त्यांच्या संभाव्य प्रवेशाचे संकेत देत त्यांना भाजपमध्ये सामील होण्याची जाहीर ऑफर दिली होती. यानंतर खेडेकर यांनी जरी भाजप प्रवेशाचे वृत्त नाकारले असले, तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रवेश निश्चित असल्याचे सूतोवाच केलं आहे.

मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

वैभव खेडेकर हे मनसेला सोडचिट्टी देणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू असताना आता थेट खेडेकरांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. मनसेकडून वैभव खेडेकर यांच्यासह  अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना मनसेकडून पत्र पाठवण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे.

कोण आहेत वैभव खेडेकर?

वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या 20 वर्षांपासूनचे शिलेदार मानले जातात. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. या भागात शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी वैभव खेडेकर यांनी बराच काळ संघर्ष केला होता. पण अलीकडे उभय नेत्यांमधील संघर्ष कमी झाला होता. काही दिवसांपूर्वी दापोलीत झालेल्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी आमच्यातील सर्व मतभेद भैरीच्या पायखाली गाडत आहोत, असे सांगत या संघर्षाला मुठमाती दिली होती. कोकणातील तरुण वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. खेड आणि दापोली परिसरा वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वैभव खेडेकर हे त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीसाठी ओळखले जातात. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वैभव खेडेकर यांनी पक्षाला रामराम ठोकल्यास मनसेला मोठा धक्का बसणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.