वैभव सूर्यवंशी लवकरच करणार टीम इंडियामध्ये पदार्पण! बीसीसीआयने दिली हिंट

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ हंगामात धमाकेदार कामगिरी करणारा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला कधी भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळणार याची चर्चा सुरू आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा उत्तमरित्या सामना करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत धावा वसूल केल्या. त्याची उल्लेखनीय कामगिरी पाहत अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले असून भारतीय संघाच्या निवड समितीला आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) त्याच्याबद्दल विशिष्ट सूचना मिळाल्या आहेत.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी भारतीय संघाची निवड करणारे अजित आगरकर आणि त्यांच्या टीमला वैभवसाठी जे काही आवश्यक असेल ते करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सैकिया म्हणाले, “वैभव एक अद्वितीय प्रतिभा आहे. तो भारतीय क्रिकेटचा वंडर बॉय आहे, जो भविष्यात जगभरात आपली छाप सोडण्यासाठी सज्ज आहे. निवड समिती त्याच्या हितासाठी जे सर्वोत्तम असेल तेच करेल.”

भारताचा जूनमध्ये युरोप दौरा आहे. ज्यामध्ये ऑयर्लंड विरुद्ध दोन सामन्यांची टी२० मालिका आणि इंग्लंड विरुद्ध टी२० आणि वनडे मालिका खेळल्या जाणार आहेत. या मालिकांसमोर सैकिया यांचे वरील वक्तव्य पुढे आले आहे. या दौऱ्यांसाठी संघ जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये वैभवची निवड होण्याच्या चर्चेला आणखी जोर धरला आहे.

“आयपीएल २०२६ दरम्यान भारतीय निवड समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सामने बारकाईने पाहिले आहे. ज्याप्रकारे वैभवने कामगिरी केली आहे, ते पाहता मला आशा आहे की जेव्हा ते आयर्लंड आणि इंग्लंडसाठी संघ निवडतील तेव्हा ते वैभवसाठी जे उत्तम असेल तेच करतील,” असे सैकिया यांनी पुढे म्हटले आहे.

भारतीय संघनिवडीवेळी कर्णधार आणि निवड समितीबरोबर सैकियादेखील उपस्थित असतात. त्यांनी केलेल्या या वक्तव्याकडे एक निर्देश म्हणून पाहिले जात आहे. तसेच वैभवचे कौतुक बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही केले आहे.

दिग्गज सचिन तेंडुलकर यानेही वैभवच्या फटकेबाजीचे कौतुक केले होते.

Comments are closed.