दुडम काकांचा फोन आला, मोठ्या मुलाला मारहाण…आयुषची आई धावत खाली गेली’, लेक रक्ताच्या थारोळ्यात
पुणे : पुणे शहरात एका वर्षानंतर पुन्हा टोळीयुध्द सुरू झाल्याचं चित्र दिसून आलं, ऐन गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला नाना पेठेत पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा थरार पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर ( वय वर्षे १९) याची नाना पेठेतील घराच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुरुवारी (५ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी आयुषवर अकरा गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. गोळ्या झाडल्यानंतर आयुषच्या आईने त्याला रक्ताच्या थारोळ्यात मुलाला पाहिले त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडला. आईने या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
आयुष कोमकरची आई कल्याणी गणेश कोमकरने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानंतर प्रकरणी पोलिसांनी नाना पेठेतील डोके तालमी परिसरातील आंदेकर टोळीच्या 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आयुषच्या आईने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, वनराज आंदेकरचा खून झाल्यापासून आंदेकर टोळीतील लोक त्याचा बदला घेण्यासाठी आमच्यावर पाळत ठेवून आहेत. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घरामध्ये एकटीच असतांना मला बिल्डींगमधील अश्विनी आणि दुडम काका यांनी फोन करुन सांगितलं की, तुमचा मोठा मुलगा आयुष याला कोणीतरी मारहाण केली आहे, मी लगेचच बिल्डींगच्या खाली येऊन पाहिले तर पार्किंगमध्ये लोकांची गर्दी होती. माझा मोठा मुलगा आयुष हा रक्तबंबाळ अवस्थेत पार्किंगमध्ये जमीनीवर पडलेला होता. माझा लहान मुलगा अर्णव रडत होता.
आयुषच्या आईने ओळखले आरोपी
आयुषला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने बिल्डींगमधील पार्कींगमधील असलेल्या क्लिनिकच्या डॉक्टरांना बोलावले त्यावेळी त्यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात त्याला नेण्यासाठी सांगितले. ॲम्बलुन्स व पोलीस आले आणि आयुषला घेऊन गेले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आमच्या बिल्डींगमधील पार्कींगचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी दाखवले. गोळीबार करणारे हे आंदेकर टोळीसाठी काम करत असल्याचे मी ओळखले त्यानंतर तक्रार दाखल केल्याचं आयुषच्या आईने कल्याणी कोमकरने म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
कल्याणी कोमकरने नेमकं फिर्यादीत काय म्हटले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून सोसायटीत आला. तो पार्किंगमध्ये दुचाकी लावत होता, त्या वेळी दबा धरून बसलेल्या अमन खान, यश पाटील यांनी त्याच्यावर 11 गोळ्या झाडल्या. आयुषच्या खुनाचा कट बंडु आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं कल्याणी कोमकरचं यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो क्लासवरून दुचाकीवरून आला त्यावेळी पार्किंगमध्ये त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या.
आणखी वाचा
Comments are closed.