जेष्ठ शास्त्रीय गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जेष्ठ शास्त्रीय गायिका सुमन कल्याणपूर यांचं रविवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी, तत्कालीन पूर्व बंगाल, बांगलादेशातील ढाका येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेम्माडी असे आहे. सुमन यांचे वडील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ पदावर होते आणि बऱ्याच काळापासून ढाका येथे कार्यरत होते. त्यानंतर 1943 मध्ये, त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. मुंबईत त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.

सुमन यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सेंट कोलंबस हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चित्रकलेच्या पुढील शिक्षणासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवला. त्याच वेळी त्यांनी प्रभात फिल्म्सचे संगीत दिग्दर्शक आणि कौटुंबिक मित्र पंडित केशवराव भोले यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकायला सुरुवात केली.

सुमन कल्याणपूर यांनी ‘अरे संसार संसार’, ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ यांसारखी अनेक अजरामर भावगीते गायली. आपल्या मधाळ आणि सुमधुर गायनाने त्यांनी अनेक वर्षे संगीतप्रेमींच्या मनावर राज्य केले.

सुमन कल्याणपूर यांनी हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, मैथिली, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, ओडिया आणि पंजाबी यासह इतर भाषांमधील चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. सुमन कल्याणपूर यांना हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगातील लोकप्रिय गायकांपैकी एक मानले जाते. सुमन यांनी एकूण 857 हिंदी गाणी गायली आहेत.

सुमन कल्याणपूर यांची गाजलेली गाणी

'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चा', 'ना ना करते प्यार', 'तुमने पुकारा और हम चले आये', 'तुमसे ओ हसीना', 'मेरा प्यार भी तू है', 'ना तुम हमारे जानो', 'दिल एक मंदिर' अशी अनेक हिंदी गाणी गायली आहेत.

Comments are closed.