रत्नागिरी न्यूज – कोकचे भाव गगनाला भिडले, बाजारात आंब्याला मागणी
ऊन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना कोकणातील पारंपरिक आणि आरोग्यदायी पेय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकमला मोठी मागणी वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील बाजारपेठांमध्ये कोकम आगळ, कोकम सरबत आणि सुक्या कोकमाच्या विक्रीत सध्या मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकम सालांचे उत्पादन कमी झाल्यामुळे दर मात्र गतवर्षीच्या तुलनेत गगनाला भिडले आहेत. गतवर्षी 300 ते 350 रुपये किलो असणारा आमसुलांचा दर यावर्षी थेट 700 ते 800 रुपयांवर पोहचला आहे.
विशेषतः कोकम सरबत हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी उपयुक्त मानले जात असल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडूनही त्याला मोठी पसंती मिळत आहे. कोकणात पर्यटन हंगाम सुरू असताना अनेक पर्यटकांनी कोकम सरबत, आगळ आणि कोकम उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. हापूस आंब्यासोबत कोकमलाही बाजारात चांगली मागणी मिळाल्याने उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा दर्जेदार कोकमाला चांगला दर मिळत असून, ग्रामीण भागातील महिलांकडून पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या कोकम आगळाला विशेष मागणी आहे. काही ठिकाणी घरगुती उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठेतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यंदा कोकमचं उत्पादन कमी झाल्यामुळे कोकमसालं मोठ्या प्रमाणात करणं शक्य झालेलं नाही. याच बरोबर मनुष्यबळाचा वापर आणि खर्च वाढल्यामुळे कोकमसालांचा दर देखील मोठ्या फरकाने वाढला आहे. कोकम सरबत तयार करण्यासाठी उत्पादक गावोगाव जावून कोकमची खरेदी करतात. जागेवर कोकमला प्रतिकिलो 45 रुपये दर मिळत असल्यामुळे कोकमवर प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
प्रक्रियेच्या तुलनेत दर कमी
कोकमसालं म्हणजेच आमसूलं तयार करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. तीन ते सात पुटं देवून आमसूलं तयार करण्यासाठी लागणारा कालावधी, यासाठी लागणारं मनुष्यबळ, कोकमची खरेदी, उत्पादनाची कमी यासारख्या कारणामुळे त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या तुलनेत मिळणारा दर कमी असल्यामुळे यावर्षी आमसूलांचा दर थेट 700 ते 800 रुपये किलोवर पोहचला आहे. हाच दर गतवर्षी 300 ते 350 रुपये प्रतिकिलो एवढा होता.
Comments are closed.