Ratnagiri News – हर्णे बंदरातील मासेमारी बंद; किनाऱ्यावर मासेमारी बोटींच्या शाकारणीची लगबग सुरू

समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती दिप्ती साळवी ,सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी (अंमलबजावणी अधिकारी) दाभोळ यांनी केली आहे. त्यामुळे हर्णे बंदर किनाऱ्यावर मासेमारी बोटींच्या शाकारणी कामाने वेग घेतला आहे.

दापोली येथे असलेल्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी ( अंमलबजावणी अधिकारी) दाभोळ कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेसवी , वाल्मिकिनगर , बाणकोट तर दापोली तालुक्यातील केळशी , उटंबर ,आडे , पाजपंढरी , हर्णे , बुरोंडी , पंचनदी लखडतरवाडी , दाभोळ , नवसे ,भाटी , ओणनवसे आदी ठिकाणी मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. अशा या येथील यांत्रिकी बोटींचा मासेमारी करण्याचा रविवारी ३१ मे हा शेवटचा दिवस होता.आता आजपासून पुढील दोन महिने मासेमारीचा बंदी काळ असल्याने मासेमारी करणाऱ्या बोटी या किनाऱ्यावर विसवण्यास सुरुवात झाली आहे.

मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जिवीत व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतुने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, उक्त कलम ३ अन्वये रचना केलेल्या सल्लागार समितीशी विचार विनिमय करून शासन आदेश दि. १ जुन २०१५ अन्वये १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) राज्याच्या जलधी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे नियमन करण्यात आले असून सदर नियमन केलेल्या आणि मासेमारी बंदी कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.

मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठयाचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब / वादळी हवामानामुळे हाणारी मच्छीमारांची जिवीत व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. सबब, मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांचे जिवीत व वित्त यांचे रक्षण या हेतूने या वर्षी दि. १ जुन २०२६ ते दि. ३१ जुलै २०२६ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मेलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हर्णे बंदर किनाऱ्यावर मासेमारी बोटींच्या शाकारणी कामाने चांगलाच वेग घेतला आहे.

शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना करण्यात आले असून बंदीच्या काळात कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळली तर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत ती नौका, त्यावरील उपसाधने आणि पकडलेली मासळी जप्त करून संबंधित मालकावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर, बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास अशा नौकेला शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नौकामालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या साऱ्यांचा विचार करून हर्णे बंदरात मासेमारी करणाऱ्या बोटी या किनाऱ्यावर विसवण्यास सुरुवात झाली असून बोटींना रंग रंगोटी करण्याच्या कामाने वेग घेत मासेमारी बोटींना शाकारण्याचे काम जोरदारपणे सुरू करण्यात आले आहे.

Comments are closed.