धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली आहे. समाधान खिंडकर याने ही तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी समाधान खिंडकरच्या विरोधात देशमुखांनी दिलेली तक्रारही खोटी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तर या संपूर्ण घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
समाधान खिंडकर हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादासाहेब खिंडकर यांचा भाऊ असून त्याने दादासाहेब खिंडकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोनच दिवसांपूर्वी समाधान खिंडकरवर या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Manoj Jarange Protest Connection : हॉटेलवरील कथित वादाची नेमकी पार्श्वभूमी
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाहून परतताना धनंजय देशमुख त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बीड जवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. याच दरम्यान धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर यांचा भाऊ समाधान खिंडकर देखील तिथेच जेवणाकरिता बसलेला होता.
Cross FIR In Beed : काय होते दोन्ही बाजूंचे आरोप?
या प्रकरणी समाधान खिंडकरने केलेला आरोप पुढीलप्रमाणे,
समाधान खिंडकर आपल्या मित्रांसह आणि रील स्टार रविराज साबळे यांच्यासोबत हॉटेलवर उपस्थित होता. तो रविराज साबळे यांना मोबाईलमधील व्हिडीओ दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने मोबाईल हिसकावला. याचा जाब विचारला असता, धनंजय देशमुखांनी अंगरक्षकाची बंदूक थेट समाधानच्या कानाला व डोक्याला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरून देशमुखांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
दुसरीकडे, धनंजय पंडितराव देशमुख यांनीही समाधान खिंडकर आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरोधात आपल्याला शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रति-गुन्हा (Cross FIR) दाखल केला होता. या परस्परविरोधी गुन्ह्यांमुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
CCTV Footage Exposed Claims : पोलिसांचा तपास आणि यू-टर्न
हे प्रकरण हायव्होल्टेज असल्यामुळे पोलीस उपअधीक्षक व्यंकटराम यांनी सदरील घटनेची माहिती घेत स्वतः तपास सुरू केला. पोलिसांनी दिवसभरात हॉटेल परिसरातील 30 मे रोजी रात्री 10 ते 12 वाजेदरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज अतिशय बारकाईने तपासले. तसेच धनंजय देशमुख, त्यांचा अंगरक्षक आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवले.
या संपूर्ण तपासणीत फिर्यादींनी आपापल्या तक्रारीत नमूद केलेली बंदूक रोखण्याची किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कोणतीही घटना घडल्याचं आढळून आलं नाही. दोन्ही तक्रारदारांनी वैयक्तिक आणि जुन्या वादातून एकमेकांना अडकवण्यासाठी जाणूनबुजून खोट्या तक्रारी दिल्याचं स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलीस विभागाने अधिकृत प्रेस नोट काढून दोन्ही बाजूंचे गुन्हे खोटे असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आधी गुन्हा नोंदवून नंतर पोलिसांनी घेतलेल्या या यू-टर्नमुळे पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Old Dispute Angle : सख्ख्या भावालाच धमकी दिल्याचा आरोप
या संपूर्ण प्रकरणाला जुन्या कौटुंबिक आणि न्यायालयीन वादाची मोठी पार्श्वभूमी आहे. समाधान खिंडकर हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासाहेब खिंडकर यांचा भाऊ आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी आपल्याच सख्ख्या भावाला (दादा खिंडकर) जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी समाधान खिंडकर याच्यावर बीड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी हा खोटा तक्रारींचा बनाव रचण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आलं.
Dhananjay Deshmukh Statement : थेट गृहमंत्र्यांची भेट घेणार; देशमुखांचा पवित्रा
बीड ग्रामीण पोलिसांनी या खोट्या तक्रारींबाबतचा सविस्तर चौकशी अहवाल न्यायालयात (Court) सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खोट्या तक्रारी देऊन पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेनंतर आणि खोट्या गुन्ह्यांच्या दाव्यानंतर धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, या संपूर्ण घडलेल्या प्रकाराबाबत आपण राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं माध्यमांना सांगितले आहे. तर दुसरीकडे दोन्ही तक्रारदारांनी माध्यमांसमोर अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.