वाचन संस्कृतीचा शिल्पकार हरपला; मेहता पब्लिकेशनचे अनिल मेहता यांचे निधन
ज्येष्ठ प्रकाशक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता (86) यांचे शनिवारी सकाळी कोल्हापुरात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी शर्मिला, नातू अखिल व साहिल तसेच नात कोमल असा परिवार आहे. सायंकाळी पंचगंगा घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी प्रकाशन विश्वात मेहता पब्लिशिंग हाऊस हे नाव म्हणजे एक परंपरा आहे आणि या परंपरेचे बीज रोवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अनिल मेहता यांच्याकडे पाहिले जाते. मूळचे निपाणी येथील असलेले अनिल मेहता यांनी 1965 मध्ये आपले बंधू उल्हास मेहता यांच्या साथीने कोल्हापुरात अजब पुस्तकालय सुरू केले. त्यानंतर 1976 मध्ये त्यांनी पुण्यात मेहता पब्लिशिंग हाऊसची पायाभरणी केली. आनंद यादव यांच्या ‘माळावरची मैना’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाने या संस्थेच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वि. स. खांडेकर, रणजित देसाई, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, व. पु. काळे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर आणि शांता शेळके यांसारख्या दिग्गज मराठी साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित झाली. याशिवाय इंग्रजी, फ्रेंच, डच व इतर भारतीय भाषांमधील श्रेष्ठ कृतींचे मराठी अनुवादही त्यांनी उपलब्ध करून दिले.
दिग्गजांची पुस्तके
मराठीत आणली
सुधा मूर्ती, ओशो, किरण बेदी, एस. एल. भैरप्पा, गुलजार, दलाई लामा, मलाला युसुफझाई, एपीजे अब्दुल कलाम आणि तस्लिमा नसरीन यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची पुस्तके तसेच रॉबिन पुक, मायकेल क्रायटन, मारिओ पुझो, जॉन ग्रिशम, डॅन ब्राऊन, जेफ्री आर्चर यांसारख्या आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तके मराठीत आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
मराठी इ–बुक्सची सुरुवात
त्यांनी देशात पहिल्यांदाच डीआरएम सक्षम मराठी ई-बुक्सची सुरुवात केली. सध्या ही संस्था दरवर्षी दीडशेहून अधिक नवीन पुस्तके आणि तीनशेहून अधिक पुनर्मुद्रणे प्रकाशित करते. त्यांच्या संस्थेच्या नावावर 4500 हून अधिक पुस्तकांची यादी आहे.
Comments are closed.