“50 ग्रॅम पावडर खिशात टाकेल; जामीनही मिळणार नाही अन्…”, आंदोलक विद्यार्थ्याला पोलिसाची धमकी, Video व्हायरल
पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह विद्यार्थ्यांचे दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचेही उपोषण सुरू असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीतील आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले असून बुधवारी मुंबईतही अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. याच आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केली होती. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी थेट धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंवर शेअर केला आहे.
मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला गाडीत बसवून पोलीस धमकी देत असल्याचे समोर आले आहे. आंदोलनात पुन्हा दिसले तर 50 ग्रॅम पावडर खिशात टाकून देईन. जामीनही मिळणार नाही आणि आयुष्य बरबाद होईल, अशी धमकी पोलीस अधिकारी विद्यार्थ्याला देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणारी ही दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. pic.twitter.com/dLIUcYcFYZ
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 23 जुलै 2026
किती नीचपणा सुरू आहे, पाहा! आंदोलनात सहभागी झालात तर “तुमच्या खिशात ५० ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू,” अशा धमक्या पोलिसांकडून दिल्या जात असल्याचे आरोप होत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणारी ही दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही एक्सवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात भाजपचा हात जगात कुणीच धरणार नाही.. त्याचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा पाहिजे? हा पोलीस अधिकारी आहे की अमली पदार्थांचा स्मगलर? सरकारने आधी या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करावी… यापुढे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर आता कुणीच सहन करणार नाही…! असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

Comments are closed.