सरकारचा इव्हेंट बाणा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी क्रूर थट्टा – विजय वडेट्टीवार
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या एआय फॉर ॲग्री २०२६ या परिषदेत सरकारकडून पैशांची उधळपट्टी झाल्याचे समोर आले आहे.सरकारने या परिषदेत फक्त दुपारच्या जेवणावर 52 लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
”महाराष्ट्रात कष्टाने पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळतो, शेतकरी आत्महत्या करत आहे दुसरीकडे शेतकऱ्यांच्याच नावाने कृषी परिषद भरवून सरकारी तिजोरीची उधळपट्टी सुरू आहे. ज्या राज्यातला बळीराजा दोन वेळच्या अन्नासाठी आणि कर्जापायी संघर्ष करतोय, तिथे एका दुपारच्या जेवणावळीवर ५२ लाख रुपये उडवले जातात? सामान्य शेतकऱ्यांना खतासाठी संघर्ष करावा लागतो तिथे या परिषदेत केवळ चहा आणि कॉफीसाठी १.८५ लाख रुपये उधळले गेले. एआय फॉर ॲग्री परिषदेच्या नावाखाली २२ आणि २३ फेब्रुवारीला तब्बल ५ कोटी १ लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला. त्यातही ५ कोटींच्या खर्चापैकी फक्त २ कोटींचे लेखापरीक्षण झाले आहे, उरलेले ३ कोटी नक्की कुणाच्या खिशात गेले? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
”ही परिषद नक्की कोणासाठी होती? जिओ वर्ल्ड सेंटरच्या वातानुकूलित हॉलमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून कोणता शेतकरी सुखी झाला? शेतकरी कर्जमाफी असो किंवा अवकाळी पाऊस असो शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली की हे सरकार निकष लावते, शेतकरी पात्र अपात्र ठरवण्यात येतो पण शेतकऱ्यांच्या नावाने परिषद करताना मात्र तिजोरीत खडखडाट नसतो,तेव्हा निकष लागत नाही. शेतकरी मरत असला तरी त्यांच्या नावाने इव्हेंटबाजी थांबत नाही. सरकारचा हा इव्हेंट बाणा म्हणजे जनतेच्या कष्टाच्या पैशांची आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी क्रूर थट्टा आहे”, अशी टीका वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून केली आहे.
Comments are closed.