लातूरमधील ‘त्या’ शेतकरी दाम्पत्याला दिलेला बैल निघाला आजारी; वडेट्टीवार, रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका

लातूर जिल्ह्यात स्वतः नांगर ओढणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला सरकारने दिलेल्या मदतीवरून राजकारण तापले आहे. सरकारने मदत म्हणून दिलेला बैल आजारी निघाल्याने या शेतकरी कुटुंबावर उलट उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. बळीराजाला कोणतीही शाश्वत मदत न करता केवळ जाहिरातीसाठी आणि दिखाव्यासाठी मदतीचा आव आणणारी भाजपची प्रवृत्ती या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी x वर पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांबाबत असलेली सरकारची अनास्था पुन्हा एकदा दिसून आल्याचे स्पष्ट केले. लातूर जिल्ह्यात एका शेतकरी दाम्पत्य स्वतः नांगर ओढण्याची वेळ येते याची सरकारला शरम वाटायला हवी, पण सरकारने या शेतकरी दाम्पत्याला एक बैल दिला. हा बैल दिल्यानंतर छान फोटोसेशन केले. सरकार शेतकऱ्याप्रती किती संवेदनशील आहे याचे क्रेडिट घेतले, पीआर केला. पण हा बैल आजारी निघाला. आता या शेतकरी दाम्पत्याला काहीही मदत न होता उलट त्या बैलाच्या उपचारांचा खर्च करण्याची वेळ आली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

बळीराजाला कोणत्याही प्रकारची शाश्वत मदत न करता केवळ जाहिरातीसाठी व दिखाव्यासाठी मदतीचा आव आणणारी भाजपची प्रवृत्ती या एका घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाल्याचे त्यांनी नमुद केले आहे. सरकारवर तोफ डागताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही प्रशासनाला धारेवर धरले. शेतकरी कर्जमाफीतही सरकारने असाच दिखाऊपणा केला असून या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा न होता उलट उर्वरित कर्ज भरण्याचा दबाव शेतकऱ्यांवर आल्याचा आरोप त्यांनी त्यांनी केला.

तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचाच!

शेतकऱ्यांसाठी करायचं काही नाही, पण न केलेल्या कामाचे श्रेय लाटायला महायुती सरकार नेहमीच पुढे असते, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली. महायुती सरकारच्या या ‘इव्हेंट’बाजीवर आक्षेप घेत वडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आमचे सरकारला स्पष्ट म्हणणे आहे की, अन्नदात्याला द्यायचं तर सन्मानाने द्या, हातचे राखून देऊ नका. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आपल्या बळीराजाचा आहे, हे सरकारने विसरू नये, अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले आहे.

लातूरच्या ‘त्या’ शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल, नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून दिला

सरकारच्या नियतीतच खोट आहे- रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी देखील X पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटीशर्तीच जास्त लादून ती बहुतांश शेतकऱ्यांना मिळू नये याची अधिक काळजी घेतली. आता बैलावर उपचारासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यावर आली, त्याप्रमाणेच कर्जमाफीसाठीही सरकारने घातलेल्या अटींमुळं आधी स्वतःकडचे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे, हे दिसतं. त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की, अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निर्मळ आणि मोकळ्या मनानेच द्या! शेवटी तिजोरी ही जनतेची आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Comments are closed.