विलेपार्ल्यात सोमवारी रंगणार विठूनामाचा गजर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आषाढी वारी आणि गुरुपौर्णिमेच्या भक्तिमय वातावरणात विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सोमवार, २० जुलै रोजी भक्तिरसाने नटलेले दोन वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. दुपारी ४ वाजता श्रीरंग गोडबोले लिखित-दिग्दर्शित ‘चला पंढरीसी जाऊ’ या कार्यक्रमात हृषिकेश रानडे, विराज जोशी, केतकी भावे-जोशी आणि पराग पांडव यांच्या स्वरांत संतवाङ्मयातील अजरामर रचना सादर होतील. आनंद इंगळे यांचे निरूपण, कुणाल फडके यांच्या नृत्यदिग्दर्शनासह संतचरित्रांवरील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानातून साकारलेली दृकश्राव्य मांडणी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमापूर्वी वारीतील दिंडीचा प्रत्यक्ष अनुभवही रसिकांना घेता येणार आहे.

याच दिवशी रात्री ८.३० वाजता ‘गुरू एक जगी त्राता’ या सांगीतिक-निरूपणात्मक कार्यक्रमातून गुरुतत्त्वाचा महिमा उलगडला जाणार आहे. धनंजय म्हसकर, केतकी चैतन्य आणि ओमकार प्रभुघाटे यांचे गायन, अनघा मोडक यांची संकल्पना आणि निरूपण तसेच स्वामी समर्थ आणि दत्तसंप्रदायातील दुर्मिळ रचनांचा सुरेल आविष्कार यामुळे हा आध्यात्मिक सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून या कार्यक्रमांच्या प्रवेशिका शनिवार, १८ जुलैपासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील.

Comments are closed.