बांगलादेशातील 21 जिल्ह्यांमध्ये हिंसाचार

शेख हसीना यांच्या वापसीच्या घोषणेनंतर तणाव : 28 ठिकाणी बॉम्बस्फोट : पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

► वृत्तसंस्था, ढाका

बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले असून देशातील किमान 21 जिह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सोमवार रात्रीपासून मंगळवारी संध्याकाळपर्यंत बस, ट्रक आणि रेल्वेच्या डब्यांना आग लावण्यात आली. सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

बांगलादेश पोलीस आणि ढाका महानगर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 11 जिह्यांमध्ये 22 वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच ढाका आणि अन्य सहा जिह्यांमध्ये 28 ठिकाणी देशी बॉम्बस्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमागे शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे समर्थक असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, पक्षाने हे आरोप फेटाळले आहेत.

बसला आग लावल्याने चालकाचा मृत्यू

फरीदपूर शहरातील गोलाचामट परिसरातील बस टर्मिनलवर उभी असलेली बस सोमवारी मध्यरात्री पेटवून देण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने बसवर पेट्रोल ओतून आग लावल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी बसचालक मोहम्मद कलाचन आत झोपले होते. ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले; मात्र धुरामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. ऊग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चितगावमधील सागरिका आणि कलूरघाट येथे दोन प्रवासी बस पेटविण्यात आल्या. बरगुना येथे नगरपालिकेचा ट्रक, मानिकगंजमध्ये बस आणि नाओगाव येथे दोन बस जाळण्यात आल्या. किशोरगंजमध्ये महाविद्यालयाच्या बसलाही आग लावण्यात आली. सावर आणि धामराई येथेही वाहनांना लक्ष्य करण्यात आले.

गोपालगंजमध्ये पोलिसांशी चकमक

मंगळवारी सकाळी गोपालगंज जिह्यातील तुंगीपाडा येथे विद्यार्थी लीगच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून आंदोलन केले. त्यानंतर अवामी लीग आणि जुबो लीगचे कार्यकर्तेही सहभागी झाल्याची माहिती आहे. आंदोलकांनी बीएनपी कार्यालयाबाहेरील बॅनर आणि सजावटीच्या पट्ट्यांची तोडफोड केली. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्ष सुरू झाला. या घटनेत किमान 10 जण जखमी झाल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून ते पेटविण्यात आल्याचा आरोप आहे. काशियानी आणि गोपालगंज शहरातही रस्ते अडविण्यात आले.

अवामी लीगने पोलिसांचे आरोप फेटाळले

जाळपोळ आणि हल्ल्यांच्या घटनांमागे अवामी लीगशी संबंधित कार्यकर्ते असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही व्यक्तींना पैसे देऊन हल्ले घडवून आणल्याचे प्राथमिक संकेत मिळाल्याचे अख्तर हुसेन यांनी सांगितले. मात्र, अवामी लीगचे प्रवक्ते मोहम्मद अली आराफात यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधी गटांकडून जाणीवपूर्वक अशा घटना घडविल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.

शेख हसीना यांनी सोडला होता बांगलादेश

बांगलादेशातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेची पार्श्वभूमी 2024 मधील विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी 30 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात जून 2024 मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. जुलैमध्ये आंदोलन तीव्र झाले आणि पोलीस व आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या. आंदोलनकर्त्यांनी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 5 ऑगस्ट 2024 रोजी हजारो आंदोलक त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचल्यानंतर हसीना यांनी लष्करी विमानाने बांगलादेश सोडून भारतात आश्र्रय घेतला. आता त्यांच्या पुनरागमनाच्या घोषणेनंतर पुन्हा हिंसाचार उफाळल्याने बांगलादेशातील राजकीय स्थैर्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगामी काळात परिस्थिती कशी बदलते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.