प्राचार्य अन् शिक्षकांकडून नियमांची पायमल्ली, 12वीच्या उत्तरपत्रिका जळीत प्रकरणात गुन्हा दाखल

विरार: विरारमधील 12 वीच्या परीक्षांच्या (HSC Exam) उत्तरपत्रिका जळीत प्रकरणात एचएससी बोर्डाकडून बोळींज पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेवकाने दिलेला आदेश न बाळगता, आदेशाची अवहेलना करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले आणि शिक्षिका प्रिया रोड्रिक्स यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र प्राचार्य आणि शिक्षिकेला भारतीय नागरिक सुरक्षा संहीता 2023 प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

शिक्षिकेच्या घरात 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या

विरारमध्ये 12वी 10 मार्च रोजी  कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. विरारच्या नानाभात या परिसरात राहणाऱ्या प्रिया रोड्रिंक्स या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली. उत्तर पत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत बोळींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जळालेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. प्रिया रोड्रिंक्स यांच्या घरी देवासमोरील इलेक्ट्रिक दिव्यात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. याच आगीत 12वी कॉमर्स परीक्षेचे घरी तापसण्यासाठी आणलेल्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या.

बोर्डाच्या नियमांची पायमल्ली, 300 पैकी 175 उत्तरपत्रिका जळून खाक

बोर्डाच्या नियमानुसार कोणत्याही परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेण्याची परवानगी शिक्षक किंवा प्राध्यापकाला नाही. मात्र प्राचार्य आणि शिक्षिका यांच्या संगनमतातून बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेल्या असताना ही घटना घडल्याने सर्व प्रकार उघड झाला. यात जवळ जवळ 300 उत्तरपत्रिकामधील 175 उत्तरपत्रिका जळाल्याची माहिती आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शासनाचा प्रतिनिधी म्हणून जोत्स्ना शिंदे यांनी तक्रार केली. त्यांच्यासोबत ज्योत्स्ना शिंदे यांच्या सोबत पालघरच्या माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकारी संगिता भागवत याही सोबत होत्या. ज्या शिक्षकाच्या घरी बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, त्या शिक्षिकेलाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, जळालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करून त्याचे गुणदान झाले असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. कारण गुणदान केलेला कागद सुरक्षित आहे अशी माहिती आहे. आत्पकालीन परिस्थिती आल्यास उत्तरपत्रिका नष्ट झाली असल्यास इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून संबंधित विषयाचे गुण देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.