IND vs ENG: 967 दिवसांनंतर भारतीय संघाचं त्रिकुट पुन्हा एकत्र! इंग्लंडविरुद्धच्या वनडे लढतीसाठी सज्ज

भारत आणि इंग्लंड (India and England) दोन्ही संघात 14 जुलैपासून वनडे मालिकेची सुरुवात होणार असून दोन्ही संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे, आता रणनीतीवर विचार केला जात आहे. यादरम्यान, भारतीय संघात पुन्हा एकदा ते त्रिकुट पाहायला मिळणार आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिसलं नव्हतं.

हे त्रिकुट म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह. कारण हे तिनही महान खेळाडू दीर्घकाळानंतर दिसणार असून रो-को ही जोडी सुद्धा बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मैदानात एकत्र दिसणार आहे.

जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली होती. त्यात रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांची निवड झाली होती, पण मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे विराट कोहली बाहेर पडला होता. आता 14 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात कोहली खेळताना दिसेल.

कोहलीने यापूर्वी आपला शेवटचा वनडे सामना 18 जानेवारी 2026 रोजी खेळला होता. तेव्हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिका सुरू होती. त्या सामन्यात कोहलीने 124 धावांची शतकी खेळी केली होती, पण त्यानंतर तो मैदानाबाहेर होता. पुढच्या सामन्यात जर कोहलीला फलंदाजी मिळाली, तर ती त्याची 300 वी वनडे खेळी असेल आणि तो माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांच्या विक्रमाची बरोबरी करेल.

रोहित शर्मा मागील वनडे मालिकेतही टीम इंडियाचा भाग होता, पण जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मोठ्या कालावधीनंतर वनडे खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बुमराहने आपला शेवटचा वनडे सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी खेळला होता. तो वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर बुमराहने एकही वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पुढचा सामना 14 जुलै रोजी आहे. 19 नोव्हेंबर 2023 पासून 14 जुलै 2026 पर्यंत एकूण 967 दिवस होतात. जर सर्व काही ठीक राहिले, तर तब्बल 967 दिवसांनंतर हे तिन्ही खेळाडू पुन्हा एकदा एकत्र मैदानात दिसणार आहेत.

Comments are closed.