7 हजार रुपयांच्या पेट्रोलमुळे मुलांना पैशांची किंमत कळली, वीरेंद्र सेहवाग यांनी शेअर केला मुलांबाबतचा खास किस्सा
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Team india’s Former Cricketer Virendra Sehwag) यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगाही मोठा क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पाहत आहे. त्यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग (Aaryaveer Swhwag) अंडर-19 क्रिकेट खेळत आहे. मंगळवारी (काल) आर्यवीरचा वाढदिवस होता. यानिमित्ताने सेहवाग यांनी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक भावनिक पोस्ट केली. एका मुलाखतीत त्यांनी मुलांना पैशांचे महत्त्व कधी समजले, याबद्दलही एक खास किस्सा सांगितला. मुलांच्या पगारातून गाडीमध्ये पेट्रोल भरले जाऊ लागल्यानंतर त्यांना पैशांची खरी किंमत समजल्याचे सेहवाग यांनी सांगितले.
वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितले की, त्यांची दोन्ही मुले आता क्रिकेट खेळत आहेत. त्यापैकी एक अंडर-19, तर दुसरा अंडर-16 क्रिकेट खेळत आहे. त्यांना दोन ते तीन लाख रुपये मिळतात.
याबद्दल बोलताना सेहवाग म्हणाले, कधीतरी त्यांनी गाडीत सात हजार रुपयांचे पेट्रोल भरले असेल. त्यानंतर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी सात हजार रुपये खर्च होतात, हे त्यांना समजले. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या पैशांतून हा खर्च होऊ लागला, तेव्हा त्यांना पैशांची किंमत कळली. कारण, जोपर्यंत त्यांच्या वडिलांच्या पैशांतून खर्च होत होता, तोपर्यंत त्यांना त्याचे काहीच वाटत नव्हते.
त्यांनी सांगितले की, मुलांना बीएमडब्ल्यू किंवा रेंज रोव्हरसारख्या महागड्या गाड्यांमधून फिरावेसे वाटते. त्यांना महागडी घड्याळे घालण्याचीही आवड असते. या वयात अशा गोष्टींचे आकर्षण असणे स्वाभाविक आहे. मात्र, एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्यांना हे समजेल की, ही केवळ दिखाव्याची जीवनशैली आहे.
दिखाव्यासाठी जगण्यापेक्षा असं काहीतरी करा की लोकांनी तुमच्याकडे पाहून म्हणावं, याने आयुष्यात काहीतरी करून दाखवलं आहे, असा सल्लाही सेहवाग यांनी दिला.
आर्यवीरच्या वाढदिवसानिमित्त वीरेंद्र सेहवाग यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “कालपर्यंत बोट धरून चालायला शिकवत होतो, आणि आज तुला तुझ्या स्वप्नांच्या दिशेने धावताना पाहत आहे. एक वडील म्हणून मला याचा आनंद आहे की, तू एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पुढे जात आहेस, स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहेस आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेस.
तुझी स्वप्ने मोठी पाहण्याची हिंमत, मेहनत करण्याची शिस्त आणि सतत शिकत राहण्याची नम्रता कायम असू दे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर, तुझ्या स्वप्नांसाठी लढ आणि आयुष्य नेहमी मनमोकळेपणाने जग. ही संपूर्ण दुनिया तुझी आहे, बेटा. मी नेहमीच तुला प्रोत्साहन देत राहीन.
Comments are closed.